Chandrayaan-3 : चंद्रावरील तापमान किती? तापमान पाहून इस्रोचे शास्त्रज्ञही थक्क; म्हणाले, वाटलंच नव्हतं की…
चांद्रयान -3 चंद्रावर पोहोचल्यानंतर कामाला लागलं आहे. विक्रम लँडरने चंद्रावरील तापमानाची माहिती पाठवली आहे. चंद्रावरील ही माहिती इस्रोच्या शास्त्रज्ञांसाठी आश्चर्यकारण आणि थक्क करणारी आहे.
नवी दिल्ली | 28 ऑगस्ट 2023 : भारताचं चांद्रयान मिशन यशस्वी झालं आहे. चांद्रयान-3 ने दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवलं आहे. त्यामुळे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. चंद्रावरील पाणी आणि तापमानाचा अभ्यास करण्यासाठी हे यान पाठवण्यात आलं आहे. चंद्रावर अत्यंत कमी तापमान असेल असं इस्रोच्या शास्त्रज्ञांना वाटत होतं. मात्र, त्यांचा हा अंदाज साफ चुकला आहे. चांद्रयानाने रविवारी काही तापमानाची माहिती पाठवली आहे. चंद्राच्या गोलार्धावर 70 डिग्री सेल्सिअस तापमान असल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे शास्त्रज्ञांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.
चंद्राच्या गोलार्धावर 20 डिग्री सेंटिग्रेड ते 30 डिग्री सेंटिग्रेड तापमान असेल असा शास्त्रज्ञांना अंदाज होता. सर्वांना तसंच वाटत होतं. मात्र, प्रत्यक्षात चंद्रावर 70 डिग्री सेंटिग्रेड तापमान असल्याचं आढळून आलं आहे. त्यावर इस्रोच्या शास्त्रज्ञांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. हे आश्चर्यकारक आहे. आमच्या कल्पेनेपेक्षाही अधिक आहे. पृथ्वीवर क्वचितच अशी गोष्ट असू शकते. त्यामुळेच चांद्रयान 3 चे निष्कर्ष अत्यंत अत्यंत महत्त्वाचे आहेत, असं इस्रोचे शास्त्रज्ञ बीएच दारूकेशा यांनी सांगितलं.
पृथ्वीवरही एवढा फरक नाही
जेव्हा आपण पृथ्वीच्या आत दोन ते तीन सेंटीमीटर जातो तेव्हा मोठ्या मुश्किलीने तापमानात दोन ते तीन डिग्री सेंटिग्रेड भिन्नता पाहायला मिळते. पण चंद्रावर 50 डिग्री सेंटिग्रेडचा फरक आहे. ही वेगळीच गोष्ट आहे, असंही दारूकेशा यांनी सांगितलं. दक्षिण ध्रुवाच्या जवळपास चंद्राच्या गोलार्धावर तापमानातील मोठा फरक आहे.
70 डिग्री सेल्सिअस पासून ते शून्य आणि 10 डिग्री सेल्सिअसच्या खाली तापमान आहे. चंद्रावरील तापमानाबाबतचं हे नवं संशोधन आहे. इस्रोच्या चांद्रयान मोहिमेमुळे जगाला चंद्रावरील तापमानाची माहिती पहिल्यांदाच मिळाली आहे. त्यामुळे चंद्रावरील संशोधनाला अधिक गति मिळण्याची शक्यता आहे.
म्हणून निवड
विक्रम पेलोडने चंद्रावरील गोलार्धाचे तापमान वेगवेगळ्या पद्धतीने मोजलं आहे. त्याबाबतचा ग्राफ इस्रोने जारी केला आहे. या चार्टवरून चंद्रावरील तापमानाचा अंदाज येतो. जमिनीवर तापमान 50 डिग्रीच्या जवळपास असतं. तर 20 सेंटीमीटरच्या उंचीवर हे तापमान 60 डिग्री सेल्सिअसने अधिक वाढते. -80 सेमीवर खोल, जमिनीच्या आत तापमान शून्य ते 10 डिग्री सेल्सिअसपर्यंत येते.
दिवसा तापमान मोजण्यात आलं आहे. कारण चंद्रावरही एक चंद्र दिवस सुरू आहे. भारताने चांद्रयान मोहीम सुरू केली. त्यासाठी चंद्राचा दक्षिण ध्रुव हा भाग निवडला. कारण दक्षिण ध्रुवावर सूर्याची किरणे फार कमी पडतात. त्यामुळे या ठिकाणी पोहोचण्याचा निर्णय घेतल्याचं इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी सांगितलं.