मुंबई : 29 ऑगस्ट 2023 | देशातील २६ प्रमुख पक्षांच्या आघाडीची तिसरी महत्वाची बैठक 1 सप्टेंबरला मुंबईतील हॉटेल ग्रँड हयात येथे होणार आहे. दिल्ली आणि बंगळूर येथे झालेल्या दोन बैठकीनंतर ही तिसरी बैठक मुंबईत होत आहे. शिवसेना (उद्धव ठाकरे) गट या बैठकीचे यजमानपद भूषवित आहे. INDIA आघाडीमध्ये कुणीही संयोजक नसावा, कोणत्याही पक्षाचा प्रमुख नसावा. त्याऐवजी 11 सदस्यांची समिती नेमावी अशी भूमिका शिवसेनेने (उद्धव ठाकरे गट) घेतली आहे. परंतु, मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीमध्ये INDIA आघाडीच्या लोगोचे अनावरण आणि ‘INDIA’ चे संयोजक पदाबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
भारतीय झेंड्याप्रमाणेच INDIA आघाडीचा लोगो असणार आहे. या लोगोमध्ये भगवा, सफेद, निळा, हिरवा असे चार रंग आहेत. या चार रंगांच्या माध्यमातून देशातील जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न INDIA आघाडी करणार आहे. INDIA आघाडी या नावाला साजेसा असा हा नवा लोगो असणार आहे, अशी माहिती उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी दिली.
INDIA आघाडीचा संयोजक कोण असावा याबाबत मतमतांतरे आहेत. पण, ही एक व्यवस्था आहे. विरोधी पक्षांची बैठक हा शब्द आम्ही मोडून काढला आहे. देशातल्या २६ महत्वाच्या पक्षांची बैठक आहे. त्याचे यजमानपद आमच्याकडे आहे. कॉंगेस,राष्ट्रवादी आम्ही एकत्रच आहोत. दोन दिवस ही बैठक चालेल आणि या बैठकीतून देशाच्या बदलाला आणि परिवर्तनाला सुरवात होईल, असे राऊत म्हणाले.
उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडले आहेत. शरद पवार यांनी मध्यंतरी जी काही विधाने केली मात्र त्यामुळे त्यांच्याविषयी किंवा त्यांच्या भूमिकांविषयी आम्हाला कोणताही संभ्रम नाही. शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे आज बैठकीच्या ठिकाणी भेट देऊन तेथील आढावा घेअणार आहेत अशी माहिती राऊत यांनी दिली.
INDIA आघाडीमध्ये देशातील २६ प्रमुख पक्षाचे नेते सहभागी होणार आहेत. त्यामुळे 11 सदस्यांची समिती नेमावी अशी सूचना आम्ही केली आहे. यात शिवसेना, समाजवादी पार्टी, राष्ट्रवादी (शरद पवार गट), तृणमूल काँग्रेस, डावे, द्रमुक या प्रमुख पक्षांचा प्रत्येकी एक प्रतिनिधी असावेत अशी आमची भूमिका आहे, असे ते म्हणाले.
दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची सर्वसहमतीने INDIA च्या संयोजक पदी नियुक्तीवर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे. त्याचप्रमाणे नितीश कुमार, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, राहुल गांधी यांचीही नावे चर्चेत आहेत.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना प्रदीर्घ राजकीय अनुभव आहे. दलित समाजाचे नेते आणि सर्व राजकीय पक्षात सौहार्दपूर्ण संबंध ही मल्लिकार्जुन खरगे यांची जमेची बाजू आहे. मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर व्यक्तिगत पातळीवर टीका करून त्यांना लक्ष्य करणे टीम भाजपपुढे मोठे आव्हान असणार आहे असेही या सूत्रांनी सांगितले.