ही ‘गजनी छाप’ पार्टी, इंडियाच्या बैठकीआधीच ‘या’ नेत्याची कॉंग्रेसवर टीका
लांडगा आला रे आला असे म्हणणारे काही लोक होती. त्यांच्याशी अजूनही नाती संबंध ठेवणारे काही जण आहेत. ज्यांचा संविधानावर विश्वास नाही त्यांना संविधानामध्ये काय लिहिलंय हे समजत नाही त्यांच्यावर किती विश्वास ठेवायचा?
मुंबई : 24 ऑगस्ट 2023 | कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकाजुर्न खर्गे यांनी दिल्ली येथे भाजप विरोधी पक्षांची एक बैठक बोलावली होती. त्यानंतर विरोधी पक्षांची दुसरी बैठक बंगळूर येथे झाली. या बैठकीतच या आघाडीला इंडिया असे नाव देण्यात आले. या दोन बैठकीनंतर आता इंडियाची तिसरी महत्वाची बैठक मुंबईत होत आहे. शिवसेना ( उद्धव ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) हे या बैठकीचे आयोजक आहेत. या बैठकीला २६ पक्षांचे नेते उपस्थित रहाणार आहेत. मात्र, त्याआधीच भाजपच्या मोठ्या नेत्याने कॉंग्रेसवर हल्लाबोल केला आहे. कॉंग्रेस ही गझनी छाप पार्टी असल्याचं या नेत्याने म्हटलंय.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी पुन्हा निवडून आले तर देशात निवडणुका होणार नाही असे मोठे विधान केले. त्यावर पलटवार करताना राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, लांडगा आला रे आला असे म्हणणारे काही लोक होती. त्यांच्याशी अजूनही नाती संबंध ठेवणारे काही जण आहेत. ज्यांचा संविधानावर विश्वास नाही त्यांना संविधानामध्ये काय लिहिलंय हे समजत नाही त्यांच्यावर किती विश्वास ठेवायचा?
आपल्या देशात आर्मी अशा पद्धतीने कोणी वागायला गेला तर हे सैनिक शूरवीर आहेत त्या देशात अशाप्रकारे कोणी वागू शकत नाही. तरीही या राज्याचा संविधान न समजल्यासारखं करून एखादा नेता अशी भीती दाखवत असेल तर जनतेने अशा नेत्याचे खरं रूप समजून घेतलं पाहिजे. संविधान, देशाची न्याय व्यवस्था, आर्मी, सैन्यदल ही सारी व्यवस्था आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा निवडून आल्यास देशात निवडणुका होणार नाही हे जे काही सांगत आहेत ती अफवा आहे, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
तुमची जीभ थरथरत असेल तर…
चंद्रयानचे यश हे स्वर्गीय पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे असल्याचा दावा कॉंग्रेसने केला. मात्र, हे सर्व कोणी केलं हे क्रेडिट घेण्याची आवश्यकता नाही. जनतेच्या ते लक्षात आहे. याचे क्रेडिट माननीय मोदीजी यांनी इस्रो आणि वैज्ञानिक यांना दिले आहे. देशाच्या वैज्ञानिकांनी चंद्रावर जाऊन आपला तिरंगा साउथ भागात अशा ठिकाणी उचललं त्या ठिकाणी जगामधील कोणत्याही देशातले कोणी उतरवलं नव्हतं. त्याचा आनंद साजरा करा. विश्व गौरव, देश नायक नरेंद्र मोदी यांचे कौतुक करण्यासाठी तुमची जीभ थरथरत असेल तर कौतुक करू नका, असा टोलाही त्यांनी कॉंग्रेसला लगावला.
गजनी छाप पार्टी आहे
चंद्रयानच्या यशामुळे मोठ्या मनाने जनतेचे कौतुक करा. जनतेने माननीय मोदीजीना देशाचे प्रधानमंत्री केले आहे. त्याच्यामुळे त्यांना धन्यवाद द्या. चंद्रयान दोनच्या वेळेस हीच काँग्रेस पुढे येऊन सांगत होते. त्यावेळी ते काय म्हणले होते ते आठवून बघा. ते आता विसरले का? काँग्रेसला आता पॉलिटिकल अल्झायमर झाला आहे. ही गजनी छाप पार्टी आहे. यांना स्वतःच सकाळी काय बोलले हे आठवत नाही, अशी टीकाही सुधीर मुनगंटीवार यांनी केली.