गुवाहाटीला जाण्यामुळे बदनाम झालो, त्या बदल्यात काय मिळालं? बच्चू कडू यांचा मोठा गौप्यस्फोट
योगायोगाने गुवाहाटीला जाण्याचा योग आला. त्यावेळी देवेंद्र फडणीस यांनी फोन करून आपल्यासोबत यावं असे म्हटले. त्यावेळी मी तुमच्यासोबत येतो पण दिव्यांग मंत्रालय स्थापन करत असाल तरच येतो नाही तर...
सांगली : 24 ऑगस्ट 2023 | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांवर ५० खोके घेतल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत होता. मात्र, गुवाहाटीला गेलेले आमदार हा आरोप सातत्याने फेटाळत होते. विरोधकांच्या या आरोपामुळे त्या आमदारांची राज्यात खूप बदनामी झाली. शिवसेना आमदार यांच्यासोबत काही अपक्ष आमदारही गुवाहाटीला गेले होते. त्यातील मंत्रीपदाची आस असलेले आमदार बच्चू कडू यांचाही समावेश होता. अखेर, आमदार बच्चू कडू यांनी गुवाहाटीला जाऊन आपल्याला काय मिळाले याचा मोठा गौप्यस्फोट केला आहे.
सांगली येथे दिव्यांग बांधवांच्या जिल्हास्तरीय मेळाव्याचे उद्घाटन आमदार बच्चू कडू यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मी दहावेळा दिव्यांग मंत्रालय उभारा ही मागणी केली. राज्यमंत्री असूनही माझी मागणी पूर्ण झाली नाही, असे ते म्हणाले.
योगायोगाने गुवाहाटीला जाण्याचा योग आला. त्यावेळी देवेंद्र फडणीस यांनी फोन करून आपल्यासोबत यावं असे म्हटले. त्यावेळी मी तुमच्यासोबत येतो पण दिव्यांग मंत्रालय स्थापन करत असाल तरच येतो नाही तर तुमच्यासोबत येत नाही असे मी निक्षून सांगितले असे त्यांनी सांगितले.
मी दुसऱ्यांदा गुवाहाटीला गेलो. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगितले की तुम्हाला दिव्यांग मंत्रालय स्थापन करायचा शब्द पूर्ण करायला हवा. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट मुख्य सचिवांना फोन केला. त्यावेळी त्यांना कॅबिनेटची नोट बनवायली सांगितली. मुख्यमंत्री शिंदे यांच्यामुळेच दिव्यांग मंत्रालय मिळाले असा दावाही त्यांनी केला.
महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग कल्याण विभाग तसेच सांगली जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषद, सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग कल्याण विभागाने दिव्यांगाच्या दारी अभियान 2023 अंतर्गत हा मेळावा आयोजित करण्यात आला होता.
गुवाहाटीला जाण्यामुळे आमची राज्यात खूप बदनामी झाली. पण त्याची पर्वा नाही. त्या बदनामीच्या बदल्यात आम्हाला दिव्यांग मंत्रालय मिळालं, असे सांगत बच्चू कडू यांनी या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभारही मानले.