राज्यात पुन्हा मोठा राजकीय भूकंप? काँग्रेस पक्ष फुटणारच, आमदार, खासदारांमध्ये अस्वस्थता; भाजपच्या बड्या खासदाराचा दावा
राष्ट्रवादीतील फुटीनंतर आता काँग्रेस पक्ष फुटणार आहे. काँग्रेसच्या आमदार आणि खासदारांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. त्यामुळे हा पक्ष लवकरच फुटेल, असा दावा भाजपच्या बड्या खासदाराने केला आहे.
सोलापूर | 28 ऑगस्ट 2023 : राज्यात आधी शिवसेनेत फूट पडली. त्यानंतर राष्ट्रवादीत फूट पडली. या दोन्ही गटांनी भाजपसोबत हातमिळवणी करत राज्यात सत्ता स्थापन केली. लोकसभा निवडणुकीला अजून आठ ते नऊ महिने बाकी असून येत्या काळात आता काँग्रेसमध्ये फूट पडणार आहे. काँग्रेसचे आमदार आणि खासदार अस्वस्थ आहेत. ते कधीही भाजपमध्ये प्रवेश करतील, असा दावाच भाजपचे माढ्यातील खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केला आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते. नाईक निंबाळकर यांच्या या राजकीय भूकंपाच्या दाव्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
सत्तेच्या विरोधात काँग्रेसचे आमदार, खासदार राहूच शकत नाहीत. काँग्रेसच्या आमदार खासदारांमध्ये मोठी अस्वस्थता आहे. या आमदार आणि खासदारांनी त्यांची अस्वस्थता मला खासगीत बोलून दाखवली आहे. त्यामुळे या अस्वस्थतेतूनच काँग्रेस पक्ष फुटणार असून सध्या काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर आहे, असा दावाच रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केला आहे.
पवारसोबत आल्यास आनंदच
पवार कुटुंब एकत्र राहणे गरजेचे असून अजित पवारांसह अन्य आमदार सहकारी भाजपकडे गेले आहेत. राष्ट्रवादी पक्षातले वाद मिटवून शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी भाजप पक्षात आल्यास देशाचे आणि राज्याचे कल्याणच होईल. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट होतील. शरद पवार भाजपात आल्यास त्याचा आम्हांला आनंदच होईल, असं नाईक निंबाळकर म्हणाले.
पवारांना ऑफर दिलीय का?
भाजपाने शरद पवारांना पक्षात येण्यासाठी कोणती ऑफर दिली आहे का? असा सवाल त्यांना करण्यात आलं. त्यावर याची मला तरी कल्पना नाही. पण अशी ऑफर देण्याची शक्यता फारच कमी आहे, असा दावा त्यांनी केला.
पक्षाचा आदेश पाळणार
येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या 50 जागा नक्कीच वाढलेल्या दिसतील. पुढची 10 वर्ष राज्यात आणि केंद्रात भाजपचं सरकार कायम राहील. लोकसभेच्या पुढच्या टर्मसाठी मी तयारच असून पुढच्या निवडणुकीत माढ्याचे आमदार शिंदे बंधूंनी मला निवडून आणण्याकरता सिंहाचा वाटा उचलणार आहेत. पक्षाकडुन जो आदेश येईल. तो मी पाळणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.