कोल्हापुरात दहशतवादी? एनआयएची तीन ठिकाणी छापेमारी, तिघे ताब्यात; कोल्हापुरात खळबळ
या तिघांचा कोणत्या दहशतवादी संघटनांशी संबंध आहे? ते कोल्हापूरचे स्थानिक रहिवासी आहेत की बाहेरचे? त्यांचा प्लान काय होता? यापूर्वी त्यांनी दहशतवादी कारवायांमध्ये भाग घेतला होता का?
कोल्हापूर | 14 ऑगस्ट 2023 : स्वातंत्र्य दिनाच्या एक दिवस आधीच एनआयएने कोल्हापुरात मोठी कारवाई केली आहे. एनआयएने कोल्हापुरात तीन ठिकाणी छापेमारी करून तीन संशयितांना ताब्यात घेतलं आहे. या तिघांचाही दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचं सांगितलं जात आहे. विशेष म्हणजे स्थानिक पोलिसांना न सांगता एनआयएने ही कारवाई केली आहे. कोल्हापुरातून तीन जणांना ताब्यात घेण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या तिघांचा नेमका प्लान काय होता? अशी चर्चा आता कोल्हापुरात रंगली आहे.
एनआयएने 5 राज्यात 14 ठिकाणी छापेमारी केली आहे. राज्यातही पाच ठिकाणी छापेमारी केली आहे. राज्यात कोल्हापूर आणि नाशिकमध्ये ही छापेमारी करण्यात आली आहे. एकट्या कोल्हापुरातच तीन ठिकाणी छापे मारले आहेत. कोल्हापुरातील कोल्हापूर, इचलकरंजी आणि हुपरीत एनआयएने छापेमारी केली. पोलिसांना न सांगता अचानक ही छापेमारी करण्यात आली आहे. या प्रकरणी एनआयएने तीनजणांना ताब्यात घेतले आहे. हे तिघे संशयित दहशतवादी संघटनांशी संबंधित असल्याचा एनआयएचा संशय आहे.
धागेदोरे हाती
एनआयएला कोल्हापुरातील छापेमारीत महत्त्वाच्या गोष्टी हाती लागल्याचं सांगितलं जात आहे. संशयास्पद कागदपत्रे, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि लोखंडी शस्त्रे जप्त एनआयएने जप्त केल्याचं सांगितलं जात आहे. स्थानिक पोलिसांना कल्पना न देता एनआयए पथकाने ही गोपनीय कारवाई केली आहे. एनआयएने आधी काही लोकांची चौकशी केली. त्यानंतर ही छापेमारी केली आहे. तिघांना अटक करण्यात आली असून या तिघांची कसून चौकशी केली जाणार आहे.
या तिघांचा कोणत्या दहशतवादी संघटनांशी संबंध आहे? ते कोल्हापूरचे स्थानिक रहिवासी आहेत की बाहेरचे? त्यांचा प्लान काय होता? यापूर्वी त्यांनी दहशतवादी कारवायांमध्ये भाग घेतला होता का? त्यांनी दहशतवादी प्रशिक्षण घेतलं होतं का? त्यांना आर्थिक रसद पुरवली गेली का? त्यांच्यासोबत आणखी कोण कोण आहेत? आदी माहिती या तिघांकडून घेतली जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
पश्चिम महाराष्ट्राशी कनेक्शन काय?
तसेच दहशतवाद्यांचं पश्चिम महाराष्ट्राशी काय कनेक्शन आहे? याची चौकशीही केली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. स्वातंत्र्य दिनाच्या दोन दिवस आधीच एनआयएने मोठी कारवाई केल्याने कोल्हापुरात खळबळ उडाली असून लोक दहशतीखाली आहेत. या घटनेमुळे कोल्हापुरात उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.
दोन वर्षानंतर पुन्हा कारवाई
यापूर्वी दीड ते दोन वर्षांपूर्वी एनआयएने कोल्हापुरातील सुभाषनगर परिसरात छापेमारी केली होती. त्यावेळी एका संशयिताला एनआयएने ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर आता तीनजणांनी ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यामुळे कोल्हापूर हा दहशतवाद्यांचा अड्डा तर बनत नाही ना? असा संशयही व्यक्त केला जात आहे.