Sharad Pawar | अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या काही आमदारांबाबत शरद पवार यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फुट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्यात गुप्त बैठक पार पडली. यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. असं असताना शरद पवार यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
सोलापूर | 13 ऑगस्ट 2023 : राज्याच्या राजकारणात मोठ्या उलथापालथी गेल्या काही दिवसात पाहायला मिळाल्या. अजित पवार यांनी भाजपासोबत वेगळी चूल मांडल्यानंतर राष्ट्रवादीत दोन गट पडले. अजित पवार आणि शरद पवार हे दोन गट पडले आहेत. असं असताना या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याने राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे. एकिकडे शरद पवार राज्यात महाविकास आघाडीसोबत असताना ही बैठक का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दुसरीकडे, शरद पवार यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपासोबत जाणार नाही, असं त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे. तसेच अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या लोकांबाबतही म्हणणं मांडलं आहे.
काय म्हणाले शरद पवार?
“काही लोक येतात. काही लोकं दुखी आहे. त्यांना असं वाटतं की, जे झालं ते चुकीचं झालं आहे. आमच्याकडून ते झालं नसतं तर बरं झालं असतं, असं काहींचं म्हणणं आहे.थेट येऊन बोलत नाहीत. पण कुणाच्या माध्यमातून सांगत असतात. सांगतात झालं गेलं ते सांभाळून घ्या.”, असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं.
2024 च्या विधानसभा निवडणुकीत कोणाची सत्ता येईल असं वाटतं? याबाबतही शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितलं. “2024 च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील पक्षाकडे सूत्र असतील.”, असं त्यांनी सांगितलं.
भाजपासोबत जाणार का? असा प्रश्नही त्यांना यावेळी पत्रकारांनी विचारला. त्यावर शरद पवार म्हणाले की, “भाजपासोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही. भाजपाची विचारधारा आमच्या चौकटीत बसत नाही. त्यामुळे माझ्या भूमिकेत कोणताही बदल होणार नाही.” तसेच भाजपाकडून सत्तेचा गैरवापर होत असल्याची टीका त्यांनी केली.
दरम्यान, सांगोल्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार एकाच मंचावर आले होते. गणपतराव देशमुख यांच्या पुतळ्याचं अनावर कार्यक्रमानिमित्त एकत्र आले . यावेळी दोन्ही नेत्यांनी गणपतराव देशमुख यांच्या आठवणींना उजाळा दिला.