Sangli Clash : शासकीय फाईल घेऊन फिरण्याबाबत आक्षेप घेतला, भाजप आणि राष्ट्रवादी नगरसेवकात जोरदार राडा
नेहमीच काही ना काही ना वादातून लोकप्रतिनिधींमध्ये वाद, हाणामारी होत असतात. आज पुन्हा पालिका सभेत अशीच घटना घडली आहे.
सांगली / 20 जुलै 2023 : लोकप्रतिनिधींनी आपसात राडे करण्यासाठी सांगली महापालिका प्रसिद्ध आहेत. महापालिकेत भर सभेत लोकप्रतिनिधी आपसात भिडल्याची घटना वारंवार येथे घडत असतात. अशी एक घटना आज पुन्हा एकदा घडली आहे. विकासकामांवरुन भाजप आणि राष्ट्रवादीचे अजित दादा गटाचे नगरसेवक यांच्यात महापालिकेत जोरदार राडा झाला. यावेळी राष्ट्रवादी नगरसेवकाच्या हातातील फाईली भाजपा नगरसेवकांनी हिसकावत फाडण्याचा प्रयत्न केला. भाजप नगरसेवक विवेक कांबळे आणि राष्ट्रवादी नगरसेवक योगेश थोरात यांच्यात भर सभेत जुंपली. यामुळे महापालिकेत काही काळ तणावाचे वातावरण होते.
विकासकामांच्या फाईलवरुन वाद शिगेला
सांगली महापालिकेत नियमित मासिक सभा सुरु होती. यावेळी भाजपा आणि राष्ट्रवादी अजित दादा गट नगरसेवकात जोरदार वादावादी झाली. राष्ट्रवादी दादा गटाचे नगरसेवक योगेंद्र थोरात हे विकास कामांच्या फाईली घेऊन फिरतात. यावर भाजपा नगरसेवक विवेक कांबळे यांनी आक्षेप घेत शासकीय फाईली घेऊन फिरण्याबाबत पुन्हा आक्षेप घेतला. यामुळे वाद आणखीन उसळला. हा वाद इतका शिगेला गेला की, माजी महापौर आणि भाजपा नगरसेवक विवेक कांबळे यांनी राष्ट्रवादी नगरसेवकाच्या हातातील फाईल फाडण्याचा प्रयत्न केला. यानंतर महापालिकेत एकच गोंधळ उडाला.
अजितदादा गट राष्ट्रवादी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या हातातील फाईल विवेक कांबळे यानी हिसकावून घेत त्या फाडण्याचा प्रयत्न केला. यावेळी एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकारही घडला. मात्र अन्य नगरसेवकांनी मध्यस्थी करत दोघांनाही शांत केले. यामुळे महासभेत काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.