Mumbai Crime : बनावट पासपोर्टवर 10 वर्षे करत होता परदेशवारी, ‘असा’ अडकला एटीसीच्या जाळ्यात
तब्बल दहा वर्षे तो शासनाच्या सरकारच्या धूळफेक करत होता. बनावट पासपोर्ट बनवून दहा वर्षे परदेशवारी करत होता. अखेर त्याचा हा बनाव उघडकीस आला आहे.
मुंबई / 20 जुलै 2023 : बनावट पासपोर्ट बनवून 10 वर्षे सरकारच्या डोळ्यात धूळफेक करणाऱ्या आरोपीला अखेर एटीसीच्या पथकाने अटक केली आहे. बद्रे आलम नजीर अहमद शेख असे अटक आरोपीचे नाव आहे. आरोपीने तब्बल 10 वर्षे अनेक वेळा बनावट पासपोर्टवर परदेशात प्रवास केला. आरोपीच्या गोवंडी येथील राहत्या घरातून पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पहिल्या पत्नीच्या भावाच्या नावाने आरोपीने बनावट पासपोर्ट बनवला होता. पोलिसांनी आरोपीकडून सर्व कागदपत्रेही जप्त केली आहेत. शेख याच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 465, 471 आणि कलम 3 आणि पासपोर्ट कायदा 12 (1) (b) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी केली कारवाई
बनावट पासपोर्टद्वारे बद्रे आलम नजीर अहमद शेख नामक व्यक्ती सौदी अरेबियातून भारतात आल्याची माहिती शिवाजी नगर पोलिसांच्या एटीसीला मंगळवारी इमिग्रेशन आणि सिक्युरिटी टीमने दिली. यानंतर पीएसआय प्रशांत कांबळे (एटीसी) यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार केले. मिळालेल्या माहितीवरुन पोलिसांनी शेखचा ठावठिकाणा शोधला. पोलीस शेखच्या घरी दाखल झाले असता त्याच्या राहत्या घरी एक व्यक्ती आढळून आला. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याचे नाव बद्रे आलम नजीर अहमद शेख असल्याचे सांगितले. तसेच बनावट पासपोर्ट बनवल्याचेही नाकारले.
तपासात त्याच्याकडे तीन पासपोर्ट असल्याचे समोर आले. तिन्ही पासपोर्टमधील फोटो त्याच्या चेहऱ्याशी जुळत होता. या तिघांचीही नावे आसिफ इक्बाल शेख अशी होती. पासपोर्टमध्ये त्याच्या मूळ पत्त्याऐवजी कुरेशी नगर, कुर्ला पूर्व असा पत्ता लिहिला होता. विशेष म्हणजे त्याने दोनदा पासपोर्टचे नूतनीकरण केले होते, असे पोलिसांनी सांगितले.
पोलीस चौकशीत गुन्ह्याची कबुली
पोलिसांनी शेखला ताब्यात घेत त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आसिफ इक्बाल शेख याच्या नावाने शेखने बनावट पासपोर्ट बनवला होता. आसिफ हा शेखच्या पहिल्या पत्नीचा भाऊ आहे. त्याने पासपोर्टमधील फोटो फक्त बदलला आणि तो सौदी अरेबियाला जाण्यासाठी वापरत राहिला. त्याच्याकडे आसिफ इक्बाल शेखच्या नावाची इतर कागदपत्रेही होती, त्यात त्याच्या पॅन कार्डचाही समावेश होता.
शेख हा इतर देशांमध्ये, मुख्यतः आखाती देशांमध्ये हवाला व्यवसाय करण्यासाठी जात असल्याचा पोलिसांना संशय आहे. शेख सध्या पोलीस कोठडीत असून, त्याने यापूर्वी भारतात किंवा परदेशात केलेल्या संभाव्य गुन्ह्याबाबत पोलीस चौकशी करत आहेत.