Raigad Crime : वाहतूक पोलीस बनून शाळेला भेट दिली, मुलांना वाहतूक नियमांचे धडेही दिले, पण…
तोतया वाहतूक पोलीस बनून तो शाळेत गेला. तेथे वाहतुकीच्या नियमांबाबत त्याने विद्यार्थ्यांना धडेही दिले. मात्र शाळेतील कर्मचाऱ्यांना संशय आला आणि त्याचा भांडाफोड झाला.
रायगड / 20 जुलै 2023 : वाहतूक पोलीस बनून लोकांची फसवणूक करणाऱ्या एका तोतया पोलिसाला रायगड पोलिसांनी अटक केली आहे. एपी मेस्त्री असे अटक केलेल्या 22 वर्षीय तरुणाचे नाव आहे. मेस्त्री हा मूळचा रायगड पोलादपूर येथील रहिवासी आहे. आरोपीने वाहतूक शाखेचा पीएसआय बनून एका शाळेला भेट दिली होती. यावेळी शाळेतील कर्मचाऱ्यांना त्याच्यावर संशय आला आणि त्याचा भांडाफोड झाला. शाळेतील शिक्षिकेने दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपीला अटक केली आहे. आरोपीवर कलम 170 आणि 171 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस चौकशी आरोपीने आपण पोलीस नसल्याचे कबूल केले आहे. पोलीस आरोपीची अधिक चौकशी करत आहेत.
वाहतूक पोलीस बनून शाळेला भेट दिली
आरोपी एपी मेस्त्री याने नागाव येथील एका शाळेला 11 जुलै रोजी भेट दिली. शाळेच्या मुख्याध्यापकांना भेटून त्याने वाहतूक शाखेचा पीएसआय अशी आपली ओळख करुन दिली. आरोपीने कमरेला लाल पट्टा आणि पिस्तुल पाऊच, डोक्यावर टोपी, पीएसआय एपी मेस्त्री असे नाव आणि पदनाम बॅच लावला होता, तसेच गणवेशाच्या दोन्ही खांद्यावर स्टार लावले होते. आरोपीने शाळकरी मुलांना वाहतूक नियमांबद्दल काही मिनिटे मार्गदर्शन केले, मग तो अधिकारी निघून गेला. मात्र शाळेतील कर्मचाऱ्यांना त्याच्यावर संशय आला.
शिक्षिकेच्या माहितीवरुन पोलिसांनी आरोपीला पकडले
यानंतर आरोपीने पुन्हा 14 जुलै रोजी गणवेश परिधान करत त्याच शाळेला भेट दिली. यावेळी शाळेतील एका शिक्षिकेने पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी शाळेत दाखल होत तोतया पोलिसाला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता आपण पोलीस नसल्याचे त्याने कबूल केले. यानंतर पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. पोलीस त्याची सखोल चौकशी करत आहेत.