राज्यातला पहिला प्रकल्प म्हणून चर्चा झाली, पण, उपसरपंचाच्या पत्राने उडाला गोंधळ, पत्राद्वारे केलेली मागणी ठरतेय चर्चेचा विषय
राज्यातील पहिला गोबरधन प्रकल्प हा येवला तालुक्यातील अंदूरसुल गावात उभारण्यात आला आहे. मात्र, त्या प्रकरणी उपसरपंच यांनी केलेल्या दाव्यावरुन समोर आलेली बाब धक्कादायक आहे.
येवला, नाशिक : गाव खेड्यापासून ते देशाची राजधानी असलेल्या दिल्लीपर्यंत सर्वात मोठी समस्या आहे ती घाण आणि कचऱ्याची विल्हेवाट लावावी कशी? या समस्येपासून कायमची सुटका व्हावी यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या मदतीने जिल्हा परिषदेने 50 लाख रुपयांचा निधी मिळवला होता. येवला तालुक्यातील अंदरसुल ग्रामपंचायतच्या कार्यक्षेत्रात गोबरधन गॅस प्रकल्प उभारला आहे. पण 25 टक्के काम बाकी असतांनाही प्रकल्प कार्यान्वित झाल्याचे जाहीर केल्याने याची चौकशी करत कारवाई करण्याची मागणी गावच्या उपसरपंचाने केली आहे. हा प्रकल्प लवकर सुरु करण्याची मागणी या योजनेसाठी निवड झालेल्या लाभार्थ्यांकडून केली जात आहे.
सुमारे 15 हजार लोकसंख्या असलेले येवला तालुक्यातील अंदरसूल गाव इतर गावाप्रमाणे येथे ही घाण आणि कचऱ्याची मोठी समस्या आहे. त्यातून सुटका व्हावी यासाठी ग्रामपंचायतीने केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान टप्पा दोन अंतर्गत गोबरधन गॅस प्रकल्प उभारला आहे.
या प्रकल्पात गाव शिवारातील शेती, सेंद्रिय, गुरांचा तसेच गोशाळेतील कचऱ्यावर प्रक्रिया करून गॅस बनविला जाणार आहे. या प्रकल्पाची दोन मेट्रिक टन क्षमता असून 36 किलो गॅस तयार होणार आहे. 6 हजार किलो खत आणि स्लरी यातून निर्माण होणार आहे.
या प्रकल्पात गॅस तयार होऊन तो पाईप लाईनच्या माध्यमातून ग्रामस्थांना स्वस्त दरात घरपोच पुरवठा केला जाणार आहे. राज्यातील हा पहिलाच प्रकल्प असून हा प्रकल्प सुरु झाला आहे.
विशेष म्हणजे यातून तयार होणारी स्लरी ही शेतीसाठी अतिशय उपयुक्त खत म्हणून उपयोगात येणार असल्याची माहिती आहे. गॅस आणि खत विक्रीतून ग्रामपंचायतीला मोठया प्रमाणात उत्पन्न देखील मिळणार आहे.
येवला तालुक्यातील अंदरसूल गावात गोवर्धन गॅस प्रकल्प उभारण्यात आला आहे या प्रकल्पातून पाच लाभार्थ्यांना घरगुती गॅस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ह्या प्रकल्पाचे 25 टक्के काम अपूर्ण असतानाही राजकीय श्रेय वादामुळे प्रकल्प सुरू झाल्याची घोषणा करण्यात आली आहे.
जर उद्घाटन झालेच नाही तर चालू झाल्याची घोषणा कशी करण्यात आली. मी या प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, पालकमंत्री दादा भुसे आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना देखील पत्र पाठवले आहे.
अजून उद्घाटन च नाहीतर प्रायोगिक तत्त्वावर चालू केल्याची घोषणा केली कशी? याची चौकशी झाली पाहिजे कारवाई झाली पाहिजे अशी मागणी अंदरसूल गावचे उपसरपंच किशोर बागूल यांनी केली आहे.
सध्या इंधनाचे दर गगनाला भिडले असून भारत पेट्रोलियम किंवा हिंदुस्थान पेट्रोलियम मार्फत घरगुती गॅस उपलब्ध करून देण्यात येतो हा गॅस 78 रुपये किलो पर्यंत मिळत आहे. मात्र अंदरसूल गावात गोवर्धन गॅस 50 रुपये किलो पर्यंत उपलब्ध होणार आहे.
घरापर्यंत गॅस कनेक्शन आले आहे अजून प्रकल्प चालू झाला नाही त्यामुळे हा प्रकल्प लवकरात लवकर सुरु करावा अशी मागणी या योजनेसाठी निवड झालेल्या लाभार्थी महिला वर्गाकडून होत आहे. त्यामुळे गाजावाजा केलेला प्रकल्प पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.