एकीकडे भर उन्हाळ्यात पाऊस आणि दुसरीकडे दुष्काळाच्या झळा, धरणांच्या जिल्ह्यात पाणी टंचाईचं भीषण वास्तव…
नाशिकच्या येवला तालुक्यातील पूर्व भागामध्ये भीषण पाणीटंचाई जाणवू लागली आहे. त्यामध्ये अक्षरशः महिलांना दोन ते तीन किलोमीटरवरून पाणी आणण्याची वेळ येत आहे.
नाशिक : खरंतर धरणांचा जिल्हा म्हणून नाशिक जिल्ह्यातील ओळख आहे. त्यामुळे पाणीदार जिल्हा म्हणून ओळख असतांना अनेक गावांना दुष्काळाच्या झळा जाणवत आहे. विशेष म्हणजे भर उन्हाळ्यात अवकाळी पाऊस पडत असतांना ही भीषण परिस्थिती जाणवत आहे. त्यामुळे विविध ठिकाणी पाणी टंचाई जाणवत आहे. खरंतर राज्यात एकीकडे अवकाळीचे संकट असतांना दुसरीकडे दुष्काळग्रस्त म्हणून ओळखला जाणार्या येवला तालुक्यात भीषण पाणीटंचाईचे संकट उभे राहिले आहे. येवला तालुक्यात 19 गावे आणि 12 वाड्यांवर 13 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जवळपास 32 खेपा या टँकरद्वारे करण्यात येत आहे. त्यामुळे एप्रिल संपत नाही तोच दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या आहेत.
नाशिकच्या येवला तालुक्यातील पूर्व भागामध्ये भीषण पाणीटंचाई जाणवू लागली आहे. त्यामध्ये अक्षरशः महिलांना दोन ते तीन किलोमीटरवरून पाणी आणण्याची वेळ येत आहे. माणसांसहित पिण्याच्या पाण्यासह जनावरांसाठी पाणी टंचाई निर्माण झाली आहे.
पाणीसाठी महिलांना भटकंती करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शासन दरबारी आंदोलन करत टँकरद्वारे पाणी पुरवठ्याची मागणी करण्यात आली होती याची दाखल घेत अनेक गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
टँकर आल्यानंतर लहान मुलांसह महिल्यांची पाणी मिळवण्यासाठी एकच धावपळ उडत असल्याचे येवला तालुक्यातील गावागावात दिसत आहे. कोळगाव येथील महिलांनी याबाबत आणखी पाणी देण्याची मागणी केली आहे.
येवला तालुक्यातील पूर्व भागात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई जाणवू लागली आहे. 19 गावे व 12 वाड्यांवर 13 टँकरद्वारे सध्या पाणीपुरवठा करण्यात येत आहे, तरी अजूनही पाच गावांचा प्रस्ताव प्राप्त झाला आहे.
मे महिन्यातही टँकरची संख्या वाढू शकेल अशी माहिती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अन्सार शेख यांनी दिली आहे. त्यामुळे येत्या काळात पाणी टंचाईचा प्रश्न आणखी गंभीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
खरंतर हा मतदार संघ राज्याचे उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा आहे. छगन भुजबळ यांनी येवला तालुका दुष्काळ मुक्त करण्यासाठी विविध योजना राबवल्या आहेत. मात्र, तरीही उन्हाळ्यात पाण्याची समस्या काही ठिकाणी जाणवत आहे.
अशीच परिस्थिती इतर तालुक्यात देखील आहे. विशेषतः त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अनेक गावांत पाण्याची भीषण टंचाई आहे. अनेक गावकरी सकाळपासून हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकत असतात. त्यामुळे पाण्याची ही कसरत करण्यात महिलांचीच संख्या अधिक असते. त्यामुळे हे चित्र कधी बदलणार असाच प्रश्न नेहमीप्रमाणे उपस्थित होत आहे.