Yavatmal Crime : जुना वाद पुन्हा उफाळून आला, भररस्त्यात घेराव घालून तिघांवर हल्ला
घरासमोर टोळके घेऊन उभे रहायचा. म्हणून तरुणाने टोकले. याच रागातून दुसऱ्या दिवशी गावात जे घडलं त्याने एकच खळबळ उडाली.
यवतमाळ / 20 जुलै 2023 : जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी तिघांवर भररस्त्यात चाकू आणि कोयत्याने वार केल्याची खळबळजनक घटना यवतमाळमध्ये घडली आहे. या हल्ल्यात दोघे जण ठार झाले, तर एक जखमी आहे. याप्रकरणी सहा जणांविरोधात शहर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाले आहेत. आरोपींना पकडण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार उमेश बेसरकर या प्रकरणाचा तपास करत आहेत. राहुल हरिदास केवटे आणि विठाळा वार्डात राहणारे राहुल हरिदास केवटे अशी दोघा मयतांची नावे आहेत. तर बंटी हरिदास केवटे असे जखमीचे नाव आहे. तिघेही काका-पुतणे आहेत.
काय आहे प्रकरण?
घरासमोर टोळकी का आणता असे विचारल्याने 19 जुलै 2023 रोजीच्या रात्री 10.30 च्या दरम्यान गणेश तोरकड आणि क्रिश विलास केवटे यांच्यात वाद झाला होता. याच वादातून हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात बंटीच्या पाठीवर वार करण्यात आले. त्याची प्रकृती देखील नाजूक असून, त्याला यवतमाळ येथे अधिक उपचाराकरीता पाठवले आहे. पवन बाजीराव वाळके, निलेश दीपक थोरात, गणेश संतोष तोरकड, गोपाळ शंकर कापसे, गणेश शंकर कापसे आणि अवि चव्हाण अशी हल्लेखोरांची नावे आहेत.
हल्ल्याची माहिती मिळतात अतिरिक्त एसपी पियुष जगताप, एसपी पवन बनसोड, उपविभागीय पोलीस अधिकारी पंकज अतुलकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपींना शोधण्यासाठी चारही पोलीस स्टेशनची एक टीम आणि डीबीची एक टीम रवाना करण्यात आली आहे. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. सर्वत्र तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.