अवकाळी काय हात धुवून मागे लागलाय का? शेतातील ‘ही’ गंभीर परिस्थिती पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल…
गेल्या काही आठवड्यापासून अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. अनेक शेतकऱ्यांचा शेतमाल जमीनदोस्त झाला आहे. अशातच कांदा आणि द्राक्ष बागेचे शुक्रवारी आलेल्या पावसाने पुन्हा नुकसान केले आहे.
लासलगाव, नाशिक : कांद्याची नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगाव सह परिसराला पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. शुक्रवारी दुपारी 3 वाजेपासून पाऊस आणि गारपीटीसह वादळी वाऱ्याने झोडपून काढले आहे. अचानक आलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची अक्षरशः दैना झाली आहे. शेतात काढून ठेवलेला कांदा मोठ्या प्रमाणात भिजला आहे. तर निफाड तालुक्यात द्राक्ष उत्पादक मोठ्या संख्येने असल्याने अनेक शेतकरी आणि व्यापारी उघड्यावर बेदाणा तयार करतात. या बेदाणा उत्पादकांना देखील या अवकाळी पावसाचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. तयार झालेले बेदाणे हे फेकून द्यायची वेळ बेदाणे उत्पादकांवर आली आहे .
गेल्या काही आठवड्यापासून अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. अनेक शेतकऱ्यांचा शेतमाल जमीनदोस्त झाला आहे. अनेक बागांमधील द्राक्ष सडल्याने द्राक्ष काढून फेकण्यासाठीही पैसा शिल्लक नाही. बँकेचे घेतलेले कर्ज, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा? पुढील पीक कसे घ्यावे? यासह अनेक प्रश्न शेतकऱ्यांना पडले आहे.
दुपारी दोन वाजेच्या सुमारास अवकाळी पाऊसा बरोबर गारपिट झाली. शेतात काढणीस आलेले कांदे, मका, भिजल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहेत. उन्हाळ कांदे भिजल्याने ते आता साठवणूक करता येणार नाहीत.
पुढील वर्षां साठी ऊन्हाळ कांदा बीज उत्पादनांसाठी लावलेले डोंगळे हवा आणि गारांसह पाऊस पडल्याने सर्व पीक जमीन दोस्त झाले आहेत. खरंतर मागील काही आठवड्यापासून राज्यातील विविध भागात अवकळी पाऊस होत आहे. त्यामुळे शेतीला मोठा फटका बसंत आहे.
नाशिक जिल्ह्यातील कांदा, द्राक्ष, गहू आणि डाळिंब या प्रमुख पिकांसह भाजीपाला उत्पादनाला मोठा फटका बसला आहे. त्यामध्ये कांदा आणि द्राक्ष पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. शेतकरी वर्गात या परिस्थितीमुळे आर्थिक संकट कोसळले आहे.
खरंतर शेतीमुळे झालेले नुकसान पाहता बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. अवकळी पावसाचे झालेले पंचनामे पाहता शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेली नाही. मदत मिळण्याच्या आधीच दुसरे संकट उभे राहत असल्याने बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे.
नाशिक जिल्ह्यातील शेतकरी आता पुढील पीक कसे घ्यायचे याच्या विचारात आहे. असे असतांना पुढील पिकाचे बियाणे तयार करण्याची प्रक्रिया सुरू असतांनाच संकट कोसळले जात असल्याने कांद्याचे महागडे बियाणे घेण्याची वेळ शेतकऱ्यांवर येणार आहे. त्यामुळे पुढील वर्षी कांद्याची लागवड सुद्धा कमी होण्याची शक्यता आहे.