Kerala Lottery Winner: नशीब भारी, रिक्षावाला कर्जबाजारी, पण 25 कोटींच्या लॉटरीने गरीबी संपवली सारी!
अनुपला शेफ बनायचं होतं, त्यासाठी मलेशियाला जाण्याचा प्लान होता. यासाठी अनुपने बँकेकडे 3 लाखांचं कर्ज मिळण्यासाठी अर्जही केला.
तिरुनंतपुरम: उपर वाला जब भी देता, देता छप्पर फाड के…हेराफेरी चित्रपटाचं (Hera Pheri) गाणं अगदी परफेक्ट बसतं, केरळच्या एका रिक्षाचालकावर. (Kerala Auto Driver) कहाणी फिल्मी वाटते, पण खरी आहे. केरळच्या तिरुनंतपुरममध्ये रिक्षा चालवणाऱ्या अनुपच्या (Kerala Lottery Winner Anup) आयुष्यात असंच काहीसं घडलं आहे. आणि एका रात्री अनुपने जे स्वप्नही पाहिलं नव्हतं, ते सत्यात घडलं, आधी जिथं काही हजार मिळण्यासाठी रोज झगडावं लागत होतं, तिथं कोट्यवधी (25 Cr Lottery) खात्यात आले.
त्याचं झालं असं, की नशीब बदलण्यासाठी अनुपला शेफ बनायचं होतं, त्यासाठी मलेशियाला जाण्याचा प्लान होता. यासाठी अनुपने बँकेकडे 3 लाखांचं कर्ज मिळण्यासाठी अर्जही केला. कर्ज मिळणं अवघड होतं, पण खूप पाठपुरावा केल्यानंतर अखेर 17 सप्टेंबरला अनुपला बँकेने 3 लाखांचं कर्जही मंजूर करुन दिलं.
कर्ज मिळाल्याचा आनंद होता, नवी स्वप्न दिसत होती. पण दुसरा दिवस उजाडला, आणि जे स्वप्नही पाहिलं नव्हतं, ते झालं. 18 सप्टेंबरला अनुपला चक्क लॉटरी लागली. बरं ही लॉटरी काही 2-5 लाखाची नाही तर चक्क 25 कोटी रुपयांची.
जशी लॉटरी लागली, तसा अनुपचा आनंद गगनात मावेना. यानंतर अनुपने थेट बँकेत फोन केला आणि लोन नाकारलं, हेच नाही तर मलेशियाला जाण्याचा प्लानही कॅन्सल केला.
अनुपच्या म्हणण्यानुसार, गेल्या 22 वर्षांपासून तो लॉटरीचं तिकीट विकत घेत आहे, मात्र इतक्या वर्षात 5 हजारापेक्षा जास्तीची लॉटरी त्याला कधीही लागली नाही. हे तिकीट विकत घेताना आधी दुसऱ्या नंबरचं तिकीट आलं होतं. पण त्याला मनात काही शंका आली, आणि त्याने पुन्हा दुसरं तिकीट विकत घेतलं.
अनुपला ज्या तिकीटाने तब्बल 25 कोटी रुपये मिळवून दिले आहेत, त्याचा नंबर आहे TJ7-50605. अनुपला विश्वास नव्हता की त्याला लॉटरी लागेल, त्यामुळे ही सोडत होताना त्याने पाहिलंच नाही. मात्र जेव्हा मोबाईलवर मेसेज आला, तेव्हा तो भारावून गेला.
या सगळ्यानंतर त्याने ही बातमी त्याच्या बायकोला सांगितली, अख्खं घरं आनंदीत झालं, आपलं नशीब पालटलं आहे, यावर त्यांचा विश्वास बसत नाही. अनुपने आता मलेशियाला जायचा प्लान रद्द केला आहे, लॉटरीच्या पैशातून तो केरळमध्येच आता आलिशान हॉटेल सुरु करणार आहे.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, 25 कोटींपैकी अनुपच्या हाती नक्की किती येणार? तर एका रिपोर्टनुसार, टॅक्स आणि इतर कर कापून अनुपच्या हातात तब्बल 15 कोटी रुपयांची रक्कम येणार आहे. ही रक्कम कुणी कधी स्वप्नातही विचार करु शकत नाही इतकी आहे. त्यामुळे अनुपसह कुटुंबाच्या आनंदाला पारावार उरलेला नाही.