Wrestler Protest | भारतीय कुस्तीपटूंचा लढ्याला यश, अखेर बृजभूषण सिंह यांना दणका
Brij Bhushan Sharan Singh | महिला खेळाडूंनी भाजप खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण यांच्यावर लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात दिल्ली पोलीस आज एफआयआर नोंदवू शकते.
नवी दिल्ली | भारतीय कुस्तीपटू आणि भाजप खासदार-कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या प्रकरणात कुस्तीपटूंना दिग्गज आजी-माजी खेळाडूंचा पाठिंबा मिळतोय. त्यामुळे हा विषय सोशल मीडियावरही गाजतोय. हे कुस्तीपटू गेल्या अनेक दिवसांपासून जंतरमंतर इथे सामूहिक उपोषणाला बसले आहेत. बृजभूषण सिंह यांच्यावर महिला खेळाडूंनी लैंगिक शौषण करण्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे या उपोषणात दिग्गज खेळाडू सहभागी झाले आहेत. बृजभूषण सिंह विरोधात एफआयआर दाखल करण्यात यावी, अशी मागणी या उपोषणकर्त्यांची आहे. या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून हे उपोषण सुरु आहे. अखेर या मागणीला यश आलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या मध्यस्थीनंतर अखेर आता बृजभूषण सिंह याच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात येणार आहे.
भारतीय कुस्तीपटूंच्या लढ्याला यश
Wrestlers' petition in SC: Delhi Police agrees to register FIR against WFI president Brij Bhushan
Read @ANI Story | https://t.co/KblLmJyZrn#WrestlersProtest #DelhiPolice #BrijBhushan pic.twitter.com/sCQ1hFs3M2
— ANI Digital (@ani_digital) April 28, 2023
हे कुस्तीपटू 3 महिन्यांपूर्वी जानेवारी महिन्यात धरणे आंदोलनाला बसलेले. बृजभूषण सिंह यांच्या विरोधात आरोप करत जानेवारी महिन्यात कारवाईची मागणी करण्यात आली होती. मात्र अध्यक्षांविरोधात अजूनही कारवाई झाली नाही. त्यामुळे भारतीय कुस्तीपटू पुन्हा एकदा रविवारपासून आंदोलनाला बसले. तसेच दिल्ली पोलीस बृजभूषण सिंह विरोधात कारवाई करत नसल्याने काही दिवसांपूर्वी 24 एप्रिल रोजी विनेश फोगट आणि इतर कुस्तीपटूंनी न्यालयात धाव घेतली. बृजभूषण सिंह विरोधात एफआयआर नोंदवून घेण्यासाठी कुस्तीपटूंनी न्यायालयात धाव घेतली.
सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणावर सुनावणी पार पडली. दिल्ली पोलिसांनी तक्रार नोंदवल्यानंतरही एफआयआर दाखल केलं नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायलयाने दिल्ली पोलिसांवर ताशेरे ओढले. तसेच पोलिसांना गुन्हा नोंद करुन घेण्याबाबत आदेश दिले. ज्येष्ठ आणि अनुभवी वकील कपिल सिब्बल यांनी कुस्तीपटूंची बाजू न्यायालयात मांडली.
सर्वोच्च न्यायलयाच्या आदेशानंतर कुस्तीपटूंनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू स्पष्ट केली. बृजभूषण सिंह यांना अटक करण्याची मागणी कुस्तीपटूंकडून करण्यात आली आहे. एफआयआरसाठी 6 दिवस वेळकाढूपणा करण्यात आला. त्यामुळे आामचा आता दिल्ली पोलिसांवर फार विश्वास नसल्याचं कुस्तीपटू म्हणाले. तसेच बृजभूषण सिंह यांची कोठडीत रवानगी होत नाही, तोवर आमचं उपोषण सुरुच राहिल, अशी भूमिकाही कुस्तीपटूंनी घेतली आहे.
बृजभूषण सिंह यांची पहिली प्रतिक्रिया
“माझ्याविरोधात गुन्हा दाखल होऊ शकतं असं समजलं. मात्र मला न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. मी पूर्णपणे मजेत आहे. न्यायालयात सर्व स्पष्ट होईल. दिल्ली पोलिसांनी चौकशी करावी. मला पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे. खरं सर्वांसमोर येईल. मी कुणाशी बोलणार नाही. मला मीडिया ट्रायल करायचा नाही”, अशी पहिली प्रतिक्रिया बृजभूषण सिंह यांनी दिली. आता या प्रकरणात पुढे काय होतं, याकडे देशाचं लक्ष लागून आहे.