CWG 2022आधी क्रीडाप्रेमींसाठी आनंदाची बातमी, Asian Gamesच्या नव्या तारखा जाहीर, जाणून घ्या…
19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धा या वर्षी चीनमधील हांगझोऊ येथे होणार होत्या. या CWG 2022 नंतर एक महिन्यानंतर सुरू होणार होत्या. पण चीनमधील कोरोनाचा संसर्ग वाढल्यानं त्या पुढे ढकलल्या.
नवी दिल्ली : भारतासह (India) आशियातील सर्व खेळाडूंसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. एशियन गेम्स 2022च्या (Asian Games) आयोजनाबाबत परिस्थिती स्पष्ट झाली आहे . या वर्षी होणारे खेळ कोरोना (Corona) विषाणूच्या संसर्गामुळे पुढे ढकलण्यात आले होते. आता ते पुढील वर्षी म्हणजे 2023 मध्ये आयोजित केले जातील. आशियाई ऑलिम्पिक परिषदेनं मंगळवार 19 जुलैला एक निवेदन जारी करून सांगितलं की, 19 व्या आशियाई खेळ पुढील वर्षी 23 सप्टेंबरपासून सुरू होणार आहेत, जे 8 ऑक्टोबरपर्यंत चालतील. मात्र, खेळांच्या ठिकाणी कोणताही बदल होणार नसून ते चीनमधील हांगझोऊ येथे होणार आहेत. यामुळे आता आशियातील सर्व खेळाडूंसाठी ही आनंदाची बातमी आहे असंच म्हणावं लागेल. कारण, एशियन गेम्सची वाट अनेक खेळाडून पाहत असतात. त्यांच्यासाठी खरंच ही खास बातमी ठरलीय.
OCA ने अधिकृत घोषणा केली
OCA ने मंगळवारी एक निवेदन जारी केलं की, ‘आशियाई ऑलिम्पिक परिषदेला 19व्या आशियाई खेळांच्या नवीन तारखा जाहीर करताना खूप आनंद होत आहे. आता 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर 2023 दरम्यान हांगझोऊ येथे या स्पर्धा होणार आहेत. 19 व्या खेळांचे आयोजन हांगझोऊ येथे 10 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर 2022 या कालावधीत होणार होते. पण, कोरोना महामारीमुळे OCA कार्यकारी मंडळाने 6 मे 2022 रोजी खेळ पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.’ ओसीएने येथे जारी केलेल्या निवेदनात पुढे म्हटलंय की, ‘टास्क फोर्सनं गेल्या दोन महिन्यांत चीन ऑलिम्पिक समिती (COC), हँगझोऊ आशियाई खेळ आयोजन समिती (HSGO) आणि इतर भागधारकांशी या स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी योग्य वेळ शोधण्यासाठी विस्तृत चर्चा केली आहे. या खेळांचे आयोजन इतर मोठ्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या तारखांपासून वेगळे ठेवले जाणार होते. टास्क फोर्सने शिफारस केलेल्या तारखांना OCA EB ने रीतसर मान्यता दिली होती. खेळांच्या यशाची खात्री करण्यासाठी आम्ही OCA आणि HAGOC सोबत काम करू.
ऑलिम्पिकची तयारी करण्याची संधी
प्रत्येकवेळी प्रमाणेच यावेळीही राष्ट्रकुल स्पर्धेनंतर काही दिवसांनी आशियाई क्रीडा स्पर्धा होणार होत्या. त्यामुळे अनेक खेळाडूंना खेळानंतर सावरण्याची आणि पुढील खेळांसाठी तयारी करण्याची पूर्ण संधी मिळाली नाही. हाच मुद्दा यावेळीही दिसून आला आणि याचे उदाहरण भारतीय हॉकीच्या रूपाने दाखवण्यात आले, जिथे भारताने CWG साठी ब संघ पाठवण्याचा निर्णय घेतला. मात्र, खेळ पुढे ढकलण्यात आल्याने भारताला पूर्ण क्षमतेने संघ पाठवण्याची संधी मिळणार आहे.
आशियाई खेळांच्या माध्यमातून खेळाडूंना ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरण्याची संधी मिळते. अशा परिस्थितीत अनेक खेळाडूंना पुन्हा स्वत:ला तयार करण्याची संधी मिळेल. यासोबतच खेळाडूंना ताजेतवाने होऊन या खेळांमध्ये उतरण्याची संधी मिळणार असून त्यामुळे स्पर्धा आणखी चांगली होईल. याशिवाय 2024 पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी आत्मपरीक्षण करण्याची संधीही मिळणार आहे.