Video : IPL 2023 स्पर्धेत दिग्गज खेळाडूचा मैदानातील कर्मचाऱ्यांना मदतीचा हात, त्याच्या कृतीने नेटकऱ्यांची जिंकली मनं
आयपीएल 2023 स्पर्धेतली चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या दिग्गज खेळाडूने कर्मचाऱ्यांना मदतीचा हात दिला.
मुंबई : आयपीएल स्पर्धेत बऱ्याच घडामोडी घडत आहेत. काही कृतीमुळे दु:ख होतं. तर काही कृती पाहून आनंद मिळतो. असाच काहीसा आश्चर्यकारक प्रकार लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या सामन्यात पाहायला मिळाला. लखनऊ सुपर जायंट्सची इनिंग संपण्यापूर्वी हा सामना पावसामुळे रद्द झाला.चेन्नई सुपर किंग्सने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पण 19.2 षटकांचा खेळ झाला आणि पावसाने हजेरी लावली. यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला. तत्पूर्वी पाऊस आला आणि मैदानातील कर्मचाऱ्यांची त्रेधातिरपीट उडाली. तेव्हा त्यांचा मदतील दिग्गज खेळाडू जॉन्टी रोड्स आला. हा व्हिडीओ सोशल मीडीयावर वेगाने व्हायरल होत आहे.
जॉन्टी रोड्स लखनऊ सुपर जायंट्स संघांचा क्षेत्ररक्षक प्रशिक्षक आहे. जेव्हा पावसाने हजेरी लावली तेव्हा जॉन्टी रोड्स कर्मचाऱ्यांच्या मदतीला धावला. कव्हर खेचण्यासाठी त्याने मदतीचा हात दिला. मैदानात लवकर झाकण्याची त्यांची धडपड जॉन्टी रोड्सने पाहिली आणि स्वत:च पुढाकार घेतला. त्याच्या या कृतीचं सर्वत्र कौतुक होत आहे.
.@JontyRhodes8 to the rescue ???
No shortage of assistance for the ground staff in Lucknow ?#TATAIPL | #LSGvCSK pic.twitter.com/CGfT3dA94M
— IndianPremierLeague (@IPL) May 3, 2023
एका अधिकाऱ्याने त्याची कृती पाहून त्याला थांबवलं. आम्ही करू असं त्याने त्याला सांगितलं. पण जेव्हा पुन्हा गरज पडली तेव्हा जॉन्टी रोड्स धावत गेला आणि कव्हर खेचू लागला. त्याच्या कृतीमुळे नेटकरी भारावून गेले आहेत.
आयपीएल चाहत्यांना जॉन्टी रोड्सची ही कृती चांगलीच भावली आहे. सोशल मीडियावर त्याच्या कृतीचं कौतुक होत आहे. आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडीओ पाहीला असून सोशल मीडियावर शेअर केला जात आहे.
जॉन्टी रोड्सची ओळख जगातील बेस्ट क्षेत्ररक्षकांमध्ये होते. त्याच्या आसपासनं चेंडू मारणं आणि चोरटी धाव घेणं म्हणजे अशक्यप्रायच. कारण जॉन्टी पापणी लवते न लवते तोच चेंडूवर यायचा आणि खेळाडूला तंबूत पाठवायचा. जॉन्टीने दक्षिण आफ्रिकेसाठी 52 कसोटी आणि 245 वनडे सामने खेळला आहे. कसोटीत 2535, वनडेत 5935 धावा केल्या आहेत. वनडेत 2 शतकं आणि 33 अर्धशतकं ठोकली आहेत.