CM Eknath Shinde : श्रीकांत शिंदे जाणारच होते, पण राजेंद्र गावित शिंदे गटात कसे? जाणून घ्या नेमकं कारण
काही दिवसांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बाजूला बसून मी शिवसेनेतच असल्याची ठाम भूमिका घेतल्यानंतर अचानक घुमजाव करत राजेंद्र गावित एकनाथ शिंदे गटाला जाऊन मिळाले. तर श्रीकांत शिंदेंनाही आपण शिवसेनेत असल्याचे माध्यमांसमोर सांगितले होते.
मुंबई : आम्ही शिवसैनिकच, शिवसेना सोडणार नाही म्हणणारे पालघर लोकसभेचे खासदार राजेंद्र गावित (Rajendra Gavit) आणि कल्याण-डोंबिवली मतदार संघाचे आमदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी आज शिंदे गटात (Shinde Team) प्रवेश केला. गावित आणि श्रीकांत शिंदे यांच्यासह एकूण 12 खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केला. शिवसेनेप्रती पक्षनिष्ठा असतानाही त्यांनी अचानक शिंदे गटाला जाण्याचे कारण शिंदे-फडणवीस यांची आगामी सत्ता असल्याचे सांगितले जाते. काही दिवसांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बाजूला बसून मी शिवसेनेतच असल्याची ठाम भूमिका घेतल्यानंतर अचानक घुमजाव करत राजेंद्र गावित एकनाथ शिंदे गटाला जाऊन मिळाले. तर श्रीकांत शिंदेंनाही आपण शिवसेनेत असल्याचे माध्यमांसमोर सांगितले होते. मात्र श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पुत्र असल्यामुळे ते शिवसेनेशी आज ना उद्या काडीमोड घेणार हे निश्चित होते.
आगामी लोकसभा निवडणुकीत कल्याण-डोंबिवलीत काय घडते हे पाहणे औचित्याचे
कल्याण डोंबिवलीत शिवसेनेच्या मतदारांची संख्या मोठी आहे. श्रीकांत शिंदे शिवसेनेच्या तिकिटावर येथे खासदार म्हणून निवडून आले. येथील मतदारांचे संख्याबळ पाहता शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपची मतदार संख्या बरोबरीत आहे. मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादी मित्रपक्ष असल्याने अर्थातच महाविकास आघाडीची मते भाजपवर भारी आहेत. श्रीकांत शिंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केला तरी शिवसेनेची मते मात्र पक्षालाच राहणार. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीत आगामी लोकसभा निवडणुकीत थोडी संभ्रमाची स्थिती असणार आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवाराला शिवसेना आणि राष्ट्रवादीची मते गेल्यास भाजपच्या विजयाची आशाच नाही. मात्र मनसेचा विचार केला तर कल्याण ग्रामीणमध्ये मनसेची पकड मजबूत आहे. त्यामुळे जर मनसेने मतदारांचे मन वळवण्यास बऱ्यापैकी यशस्वी झाली आणि भाजप-मनसेने हातमिळवणी केली तर भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये चांगलीच चुरस रंगेल. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत कल्याण-डोंबिवलीत काय घडते हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे.
राजेंद्र गावितांचा कायम सत्तेकडे कल
पालघर जिल्ह्यातील राजकीय गणित फारशी मजबूत नसली तरी राजेंद्र गावित यांना खासदार होण्यापेक्षा आमदार होण्यामध्ये मोठा रस आहे, अशी चर्चा अनेक ठिकाणी आहे. 2014 मध्ये पालघर जिल्ह्याच्या विभाजनाची मोठी जबाबदारी त्यांनी पार पाडली. त्यावेळी ते काँग्रेस पक्षाचे आमदार तसेच महाराष्ट्राचे आदिवासी राज्यमंत्री होते. त्यानंतर 2014 च्या पालघर विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेना भाजप युतीचे प्रतिस्पर्धी उमेदवार अमित घोडा यांनी राजेंद्र गावित यांचा 500 मताच्या फरकाने पराभव केला होता. त्यानंतर पालघर जिल्ह्याचे भाजपचे खासदार चिंतामण वनगा यांचे निधन झाल्याने जिल्ह्यामध्ये खासदारकीच्या पोट निवडणुकीचे वारे वाहू लागले.
याच दरम्यान या संधीचा फायदा घेत राजेंद्र गावित यांनी काँग्रेसची निष्ठा तोडून भाजपचे कमळ हाती घेतले आणि पोटनिवडणुकीसाठी आपले तिकीट फिक्स केले. त्यानंतर ते भाजपचे उमेदवार म्हणून निवडूनही आले. या खासदारकीची मुदत संपल्यानंतर पुढील निवडणुकीत भाजप त्यांना डोईजड होऊ लागला. म्हणून त्यांनी रातोरात भाजपचे कमळ सोडून शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेतले. रातोरात त्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश करून उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून घेतले. त्यानंतर 2019 मध्ये त्यांना शिवसेनेमार्फत खासदारकीचे तिकीट जाहीर झाले व त्यात त्यांचा विजय झाला. एकंदरीत ज्या बाजूला सत्ता झुकलेली आहे, त्या बाजूला राजेंद्र गावित यांचा कल नेहमीच राहिलेला आहे. त्यासाठी त्यांनी पक्षनिष्ठा वगैरे सोडून पक्षांतर केल्यामुळे कालांतराने दलबदलू म्हणून त्यांना संबोधले जाऊ लागले. (Rajendra Gavit and Srikant Shinde entry into the Shinde group is a shock to the Shiv Sena)