Uddhav Thackeray : जे जे मिळालं ते आनंदाने भोगलं ना, मग टीव्ही समोर रडण्याचं ढोंगसोंग कशाला?; उद्धव ठाकरेंनी रामदास कदमांना फटकारलं
कदमांच्या भावनिकतेवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केलीय. जिल्हा प्रमुखांच्या ऑनलाईन बैठकीत बोलताना उद्धव ठाकरे यांनी जे जे मिळालं ते आनंदाने भोगलं ना, मग टीव्ही समोर रडण्याचं ढोंगसोंग कशाला? अशा शब्दात रामदास कदमांवर निशाणा साधलाय.
मुंबई : राज्यात शिवसेना दुभंगली असताना आता केंद्रातही शिवसेनाला मोठा हादरा बसलाय. शिवसेनेचे 12 खासदार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटात सहभागी झाले आहेत. अशावेळी माजी मंत्री रामदास कदम यांनी शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिलाय. माध्यमांशी संवाद साधताना रामदास कदम (Ramdas Kadam) यांना अश्रू अनावर झाले. आजही माझ्यासमोर बाळासाहेब आहेत. आम्ही कष्टानं उभी केलेली शिवसेना कोसळताना वाईट वाटत असल्याचं कदम म्हणाले. त्यावेळी ते भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र, कदमांच्या भावनिकतेवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जोरदार टीका केलीय. जिल्हा प्रमुखांच्या ऑनलाईन बैठकीत बोलताना उद्धव ठाकरे यांनी जे जे मिळालं ते आनंदाने भोगलं ना, मग टीव्ही समोर रडण्याचं ढोंगसोंग कशाला? अशा शब्दात रामदास कदमांवर निशाणा साधलाय.
उद्धव ठाकरे म्हणाले की, तसं पाहिलं तर आमदार आणि खासदारांना मी सुद्धा डांबून ठेवू शकलो असतो. त्याला लोकशाही नाही म्हणत. तुम्ही मनाने गेले असाल तर मी किती दिवस तुम्हाला कोंडू शकतो. त्या गोष्टीवर माझा विश्वास नाहीये. मी आजही कार्यकर्त्यांना भेटलो. त्यांनाही सांगितलं ज्यांना जायचं त्यांनी जरूर जा नाटकं करू नका. उगाचच टीव्ही समोर जाऊन रडण्याचं ढोंग करू नका. तुम्हाला ज्यावेळेला जे जे मिळालं ते ते तुम्ही आनंदाने भोगलं. शिवसेनेच्या विरोधात कारवाया करायच्या त्याही तुम्ही केल्या. आता रडण्याचे ढोंगसोंग करू नका. शिवसैनिक तुम्हाला पुरतं ओळखून आहे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी कदमांना लगावलाय.
‘त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही’
उद्धव ठाकरे यांनी भाजपवरही जोरदार हल्ला चढवला. आज हे मुळावर घाव घालायला निघाले आहेत. ज्याला आपले मानत होतो. ते एवढे सुडाने पेटले आहेत की शिवसेना संपलीच पाहिजे या भाजपच्या डावाला बळी पडून ते आपल्या मुळावर घाव घालत आहेत. मला त्यांनी मागितलं असतं तर मी दिलं असतं. माझा स्वभाव तुम्हाला माहीत आहे. जो बाळासाहेबांचाही होता. मागितलं तर मी काहीही देईन. पण हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला तर मात्र त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिलाय.
‘जनतेच्या मनात आपल्याबद्दल प्रेम, सहानुभूती’
राजकारणात कोण काय बोलतंय त्याकडे लक्ष देऊ नका. तुम्हाला जे काम दिलं ते आठ दिवसात पूर्ण करा. जनतेच्या मनात आपल्याबद्दल प्रेम सहानुभूती आहे. त्यांच्याबाबत तीव्र राग आहे. त्याचा शिवसेना वाढीसाठी उपयोग करा. ही आलेली संधी आहे. एकदा आपण 50 लाखाचा टप्पा पार केला तर नोंदणीचे गठ्ठेच्या गठ्ठे घेऊन या. त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात मी दौरे करणार आहे. गटप्रमुख आणि शाखाप्रमुखांसोबत घेऊन काम करा, इकडे येऊ नका, असा आदेशच उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिलाय.