Rahul Gandhi Speech in Loksabha : आल्या आल्या राहुल गांधी यांची अदानी यांच्यावर कमेंट; लोकसभेत प्रचंड गदारोळ
मी भारत जोडो यात्रा सुरू केली आहे. अनेक लोकांनी मला विचारलं तू का चालत आहे? तुमचा उद्देश काय आहे? तुम्ही कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत का जात आहे. सुरुवातीला माझ्या तोंडून शब्द फुटत नव्हता.
नवी दिल्ली | 9 ऑगस्ट 2023 : तब्बल 137 दिवसानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी आज लोकसभेत भाषण केलं. विरोधकांनी आणलेल्या अविश्वास ठरावावर राहुल गांधी यांनी भाषण केलं. राहुल गांधी यांनी संसदेत आल्या आल्या थेट अदानींवर कमेंट केली. त्यामुळे लोकसभेत प्रचंड गदारोळ झाला. सत्ताधाऱ्यांनी राहुल गांधी यांच्या भाषणावर आक्षेप घेतला. यावेळी राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेतील आठवणी सांगतानाच देशातील जनतेच्या व्यथा सभागृहात मांडल्या.
राहुल गांधी यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच लोकसभा अध्यक्षांचे आभार मानले. तुम्ही मला संसदेत परत घेतलं, त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे, असं राहुल गांधी म्हणाले. त्यानंतर त्यांनी उद्योगपती गौतम अदानी यांचं नाव घेतलं. त्यामुळे संसदेत गदारोळ झाला. मी तुमची माफी मागतो. मागच्यावेळी मी अदानीच्या मुद्द्यावर बोललो. त्यामुळे एका ज्येष्ठ नेत्याला त्रास झाला. पण तुम्हाला घाबरण्याची गरज नाहीये. काहीच घाबरण्याची गरज नाही. मी आज अदानींवर बोलणार नाही. तुम्ही रिलॅक्स राहा. शांत राहू शकता. माझं भाषण मी दुसऱ्या दिशेने करणार आहे, असं राहुल गांधी म्हणाले.
हृदयापासून बोलणार
संत रुमी म्हणाले होते के शब्द हृदयातून येतात. ते हृदयात जातात. आज मी डोक्याने नव्हे तर हृदयपासून बोलणार आहे. मी तुमच्यावर अधिक आक्रमण करणार नाही. एक दोन तोफगोळे टाकेल. पण एवढंही मारणार नाही. तुम्ही रिलॅक्स राहु शकता, असंही राहुल गांधी म्हणाले.
मला लोकांना समजून घ्यायचं होतं
यावेळी त्यांनी भारत जोडो यात्रेवरही भाष्य केलं. मी भारत जोडो यात्रा सुरू केली आहे. अनेक लोकांनी मला विचारलं तू का चालत आहे? तुमचा उद्देश काय आहे? तुम्ही कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत का जात आहे. सुरुवातीला माझ्या तोंडून शब्द फुटत नव्हता. कदाचित मी यात्रा का सुरू करतोय हे मला माहीत होतं. मला लोकांना समजून घ्यायचं होतं. त्यांना समजून घ्यायचं होतं.
थोड्यावेळाने माझ्या लक्षात येऊ लागलं. ज्या गोष्टीसाठी मी मरायला तयार होतो, ज्या गोष्टींसााठी मी मोदींच्या तुरुंगात जायला तयार होतो. ज्या गोष्टीसाठी मी रोज शिव्या खाल्ल्या, ती गोष्ट मला समजून घ्यायची होती. माझ्या हृदयाला इतक्या मजबुतीने पकडून ठेवलंय ते काय आहे? हेच मला समजून घ्यायचं होतं, असं ते म्हणाले.
अहंकार गळून पडाला
मी रोज 8 ते 10 किलोमीटर चालत असतो. त्यामुळे मी रोज 20 ते 25 किलोमीटर सहज चालू शकतो, असं मला वाटत होतं. खरंतर तो माझा अहंकार होता. पण भारत काही सेकंदात अहंकार मिटवतो. भारत यात्रेत चालण्यास सुरुवात केली. दोन ते तीन दिवसातच माझ्या गुडघ्यात दुखू लागलं. माझा अहंकार मिटला. माझा अहंकार मुंगीसारखा झाला, असंही त्यांनी सांगितलं.