Tripura Elections : त्रिपुरात २८ लाख मतदार करणार नव्या सरकारचा निर्णय

| Updated on: Feb 16, 2023 | 5:14 PM

सकाळी ९ वाजेपर्यंत 13.92 टक्के मतदान झाले. अनेक ठिकाणी मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. सर्वत्र शांततेत मतदान होत आहे.

Tripura Elections : त्रिपुरात २८ लाख मतदार करणार नव्या सरकारचा निर्णय
त्रिपुरात विधानसभेसाठी लागलेल्या रांगा
Image Credit source: टीव्ही९ नेटवर्क
Follow us on

अगरतला : त्रिपुरा विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाला (Tripura Election 2023) गुरुवारी सुरुवात झाली आहे. मतदान केंद्रांवर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. 60 सदस्यीय विधानसभेसाठी 31 महिला उमेदवारांसह एकूण 259 उमेदवार रिंगणात आहेत. निवडणुकीसाठी 31,000 मतदान कर्मचारी 3,327 मतदान केंद्रांवर तैनात केले आहेत. राज्यात 28 लाख 13 हजार 478 मतदार आहेत. निवडणुकीचा निकाल 2 मार्चला जाहीर होणार आहे. त्रिपुरानंतर मेघालय व नागालँडमध्ये २७ फेब्रवारी रोजी मतदान होणार आहे. तिन्ही राज्यांचे निकाल 2 मार्च येणार आहे.

दरम्यान गुरुवारी सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली. सकाळी ९ वाजेपर्यंत 13.92 टक्के मतदान झाले. अनेक ठिकाणी मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. सर्वत्र शांततेत मतदान होत आहे.

30,000 सुरक्षा कर्मचारी 

हे सुद्धा वाचा

निष्पक्ष आणि शांततापूर्ण निवडणुकांसाठी CAPF च्या 400 कंपन्या म्हणजे सुमारे 30,000 सुरक्षा कर्मचारी राज्यात पाठवण्यात आल्या आहेत. CAPF व्यतिरिक्त आसाम रायफल्स, सीमा सुरक्षा दल, केंद्रीय राखीव पोलिस दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल आणि त्रिपुरा पोलिसांचे जवानही मोठ्या संख्येने तैनात करण्यात आले आहेत, अशी माहिती त्रिपुराचे मुख्य निवडणूक अधिकारी (CEO) गीते किरणकुमार दिनकरराव यांनी दिली.

भाजपचे सर्वाधिक उमेदवार


सत्ताधारी भाजपने सर्वाधिक ५५ उमेदवार उभे केले आहेत. भाजपची इंडिजिनस पीपल्स फ्रंट ऑफ त्रिपुरा (IPFT)सोबत युती आहे. IPFTला पाच जागा दिल्या आहेत.

मात्र, आयपीएफटीने सहा उमेदवार उभे केले आहेत. डाव्या आघाडीकडे 47 उमेदवार आहेत, तर काँग्रेस 13 जागांवर निवडणूक लढवत आहे. त्रिपुरात डाव्या-काँग्रेस यांच्यांत आघाडी आहे. याशिवाय टिपरा मोथा पक्षाने 42, तृणमूल काँग्रेसने 28 उमेदवार उभे केले आहेत. 58 अपक्ष आणि विविध छोट्या पक्षांचे 14 उमेदवारही रिंगणात आहेत.

राजकारण सोडणार


टिपरा मोथा सुप्रीमो प्रद्योत किशोर माणिक्य देबबर्मा यांनी 16 फेब्रुवारी रोजी त्रिपुरा विधानसभा निवडणुका संपल्यानंतर राजकारण सोडणार असल्याची घोषणा करून लोकांना आश्चर्यचकित केले. यापुढे बुबागरा (राजा) म्हणून कधीही मत मागणार नाही, असे ते म्हणाले.

मंगळवारी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी एका रॅलीला संबोधित करताना, त्रिपुराच्या माजी राजघराण्याचे वंशज म्हणाले की अन्न, निवारा आणि शिक्षणापासून वंचित असलेल्या गरिबांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी लढण्याची त्यांची भावना समजून न घेता अनेक नेत्यांनी त्यांचा त्याग केला आहे. टिपरा मोथा त्रिपुरातील ६० पैकी ४२ जागांवर निवडणूक लढवत आहेत.