Prashant Kishor: प्रियंका गांधीही नको, राहुल गांधीही नको, मग काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी प्रशांत किशोर यांची पसंती कुणाला?
Prashant Kishor: प्रशांत किशोर यांनी अध्यक्षपदासाठी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या नावाला नापसंती दर्शवली आहे.
नवी दिल्ली: गेल्या काही वर्षापासून काँग्रेसला (congress) पूर्णवेळ अध्यक्षपद अजूनही मिळालेला नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या कामगिरीवर प्रचंड परिणाम होत असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा तिढा लवकरच सुटण्याची चिन्हे आहेत. प्रसिद्ध राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर (prashant kishor) सध्या काँग्रेसला कम बॅक करण्यासाठी सल्ले देत आहेत. 2024मध्ये काँग्रेस सत्तेत येईल अशा पद्धतीने त्यांनी एक रोडमॅप तयार करायला घेतला आहे. हे सल्ले देत असतानाच प्रशांत किशोर यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदी कोण असावं याचा सल्लाही दिला आहे. काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी (priyanka gandhi) यांच्या नावाला प्रशांत किशोर यांनी नापसंती दर्शवली आहे. सोनिया गांधी यांनीच काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहावं असा सल्ला प्रशांत किशोर यांनी दिला आहे. त्यामुळे काँग्रेस प्रशांत किशोर यांचा सल्ला मानणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
बीबीसाला दिलेल्या मुलाखतीत प्रशांत किशोर यांनी काँग्रेसचा बेस्ट अध्यक्ष कोण असू शकतो यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. प्रशांत किशोर यांनी अध्यक्षपदासाठी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या नावाला नापसंती दर्शवली आहे. काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी आपली पहिली पसंत सोनिया गांधी याच आहेत, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. प्रशांत किशोर यांनी काँग्रेसला प्रेझेंटेशन दिलं होतं. त्यामुळे प्रशांत किशोर यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी प्रियंका गांधी यांचं नाव सूचवल्याची चर्चा होती. प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशातील निवडणुकीची जबाबदारी आपल्याच शिरावर घेतली होती. त्यामुळे प्रशांत किशोर यांचं अध्यक्षपदासाठी प्रियंका गांधी यांच्या नावाला पसंती असेल असं वाटत होतं. मात्र, स्वत: प्रशांत किशोर यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे.
मी कोणताच प्रस्ताव दिला नाही
काँग्रेस नेतृत्वाला सादरीकरण देण्यता आलं. तेव्हाच काँग्रेसच्या नेतृत्वावरही प्रदीर्घ चर्चा झाली, असं ते म्हणाले. ज्या गोष्टी खासगीत करण्यात आल्या. त्या सार्वजनिक करता येणार नाही. नेतृत्वाबाबत जे माझ्या डोक्यात घोळत होतं. ते मी त्यांना सांगितलं. ते पूर्ण समितीने पाहिलं नाही. कारण ती गोष्ट फक्त सोनिया गांधी यांनाच सांगण्यात आली. काँग्रेसच्या अध्यक्षपदी प्रियंका गांधी यांना बसवावं का? तर माझ्या ते चुकीचं ठरेल. कोणत्या व्यक्तीला अध्यक्ष करावं याबाबतचा मी असा कोणताही प्रस्ताव दिला नाही. संसदीय पक्षाचा नेता नसेल अशाच व्यक्तीला अध्यक्ष करावं असं माझं म्हणणं होतं. आता दोन्हीपदे सोनिया गांधींकडे आहेत. या दोन्ही पदासाठी दोन वेगवेगळे नेते असावेत असं माझं मत आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
माझी तेवढी उंची नाही
काँग्रेस देश हितासाठी मजबूत व्हावी हे देशहिताचं आहे. भाजपचे समर्थकही काँग्रेस मजबूत होणं देशाच्या हिताचं आहे असं सांगतील असं त्यांनी स्पष्ट केलं. काँग्रेसची लीडरशीप माझ्याकडे येईल एवढी माझी उंची नाही. त्यांनी माझं म्हणणं मांडण्याची मला संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. ज्या गोष्टींवर एकमत झालं आहे, त्या अमलात आणल्या तर काँग्रेसला त्याचा फायदाच होईल. लोकशाहीला फायदा होईल आणि देशालाही फायदा होईल, असंही त्यांनी सांगितलं.