Prashant Kishor Congress : गांधी परिवाराच्या दबदब्याला आव्हान देणारा प्रशांत किशोरांचा फॉर्म्युला काय; तो काँग्रेसने का फेटाळला?
राजकीय आखणीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांच्या काँग्रेस (Congress) प्रवेशाला अखेर पूर्णविराम मिळाल्याचे तसे कालच समोर आले. स्वतः प्रशांत किशोर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यास नकार दिला असून, एका घावात दोन तुकडे करून त्यांनी विषय संपवला. कारण...
नवी दिल्लीः राजकीय आखणीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांच्या काँग्रेस (Congress) प्रवेशाला अखेर पूर्णविराम मिळाल्याचे कालच समोर आले. स्वतः प्रशांत किशोर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यास नकार दिला असून, एका घावात दोन तुकडे करून त्यांनी हा विषय संपवला. कारण काँग्रेसला येणाऱ्या 2024 च्या निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या अनुभवाचा फायदा हवा होता. मात्र, त्यांना हवे ते अधिकार आणि बदल करण्यास पक्ष तयार नव्हता. त्यामुळे काँग्रेसची नसती ब्याद प्रशांत किशोरांनी गळ्यात पाडून घ्यायला नकार दिला. त्यांनी स्वतः ट्वीट करून ही माहिती दिली. ते आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात की, मी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार नाही. काँग्रेसच्या निवडणुकीची (Election) जबाबदारी सांभाळणाऱ्या समूहात सामिल होण्याची ऑफर मी नाकारली आहे. काँग्रेसमध्ये मोठे बदल घडवण्यासाठी आणि काँग्रेसच्या संरचनात्मक समस्या दूर करण्यासाठी माझ्यापेक्षा अधिक सक्षम नेतृत्व आणि सामूहिक इच्छाशक्तीची आवश्यकता आहे. हे माझे विनम्र मत आहे. आता प्रश्न उरतो तो हा की, प्रशांत किशोरांचा काँग्रेस प्रवेश का टळला? त्याचेच हे उत्तर.
पीके यांना काय हवे होते?
प्रशांत किशोर आणि काँग्रेस नेतृत्वात चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या होत्या. या वर्षातील पाच विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसला जबरदस्त पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर प्रशांत किशोर स्वतः काँग्रेसकडे गेले. त्यांना अध्यक्षासह सर्व मोठ्या नेत्यांसमोर प्रेझेंटेशन दिले. त्यानंतर त्यांचा काँग्रेस प्रवेश निश्चित मानला जाऊ लागला. मात्र, त्यांनी असा काही फॉर्म्युला पक्षासमोर ठेवला की, काँग्रेसने त्याला नकार दिला. कारण काँग्रेसला प्रशांत किशोर यांची राजकीय आखणीकार म्हणून गरज होती. ते त्यांच्या अनुभवाचा पूर्ण फायदा घेणार होते. मात्र, त्यांना त्यांच्या पद्धतीने काम करायला काँग्रेसने नकार दिल्याचे समजते. त्यामुळे काँग्रेस आणि प्रशांत किशोर यांचे बिनसले.
I declined the generous offer of #congress to join the party as part of the EAG & take responsibility for the elections.
In my humble opinion, more than me the party needs leadership and collective will to fix the deep rooted structural problems through transformational reforms.
— Prashant Kishor (@PrashantKishor) April 26, 2022
नेमका फॉर्म्युला काय?
काँग्रेस प्रशांत किशोर यांना इतर नेत्यांप्रमाणे मर्यादित अधिकार आणि भूमिका द्यायला तयार होती. मात्र, प्रशांत किशोर यांना आपल्या कामात कोणाचाही हस्तक्षेप नको होता. त्यावरून ते तसूभरही मागे हटायला तयार नव्हते. यालाच काँग्रेसच्या ज्येष्ठ नेतृत्वाची मंजुरी नव्हती. काँग्रेसची स्वतः काम करायची पद्धत आहे. त्यानुसार त्यांचे राजकीय धोरण आणि दिशा ठरते. मात्र, प्रशांत किशोर यांनी पक्षात काही बदल सुचवले होते. त्यावरही पक्षात सहमती नव्हती. काँग्रेसची स्वतःची विचारधारा आहे. मात्र, प्रशांत किशोर यांची कोणतीही राजकीय विचारधारा नाही. कोणत्याही पक्षासाठी त्यांना आपली विचारधारा इतक्या लवकर बदलणे सोपे नव्हते. त्यामुळेही प्रशांत किशोर यांना पक्षात घेण्यावर एकमत नव्हते.
नेतृत्वावर अडले चर्चेचे घोडे
काँग्रेसचे आजवरचे राजकारण फक्त गांधी परिवाराभोवती घुटमळलेले आहे. मात्र, प्रशांत किशोर यांच्या नियोजनानुसार त्यांना काँग्रेसचे नेतृत्व गांधी परिवाराबाहेरच्या सदस्यावर सोपण्याची इच्छा होती. त्यावरही काँग्रेसच्या ज्येष्ठ नेतृत्वाची सहमती नव्हती. कारण 2019 मध्ये राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षाचा राजीनामा दिल्यानंतर अजूनही हे पद रिकामे आहे. सोनिया गांधी या हंगामी अध्यक्ष म्हणून काम पाहतायत. शिवाय यूपीएचे अध्यक्षपदी प्रशांत किशोर यांना काँग्रेसच्या मित्र पक्षाला द्यायचे होते. त्यावरही काँग्रेसमधून नाराजी होती. काँग्रेसला मित्रांची साथ हवी असते, पण त्यांना नेतृत्व द्यायचे नसते. हेच यातून पुन्हा एकदा सिद्ध झाले.
2017 मध्येही काँग्रेसचा खो
प्रशांत किशोर यांचे तेलंगणाचे केसीआर आणि ममता बॅनर्जी यांच्यासोबत चांगले संबंध आहेत. त्यांना हे दोन्ही नेते 2024 मध्ये मोदींच्यासमोर विरोधकांचा चेहरा म्हणून उभे करायचे आहेत. त्यातच प्रशांत किशोर यांना काँग्रेसमध्ये फ्री हँड दिला, तर गांधी परिवाराच्या हातातून पक्षाची सूत्रे निसटू शकतात. मात्र, 2017 चा अनुभव पाठिशी असल्यामुळे प्रशांत किशोरही भूमिकेवर ठाम होते. त्यांना त्यावेळेस उत्तर प्रदेशात प्रियांका गांधींच्या नावावर निवडणूक लढवायची होती. मात्र, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तयार नव्हते.
मग राहुल गांधींचे काय?
2017 मध्ये काँग्रेसने समाजवादी पक्षासोबत आघाडी केली. त्यात उत्तर प्रदेश ऐवजी प्रशांत किशोर यांच्याकडे पंजाबची जबाबदारी दिली. पंजाबमध्ये काँग्रेस तेव्हा सत्तेत आली, पण उत्तर प्रदेशमध्ये पक्षाची वाईट अवस्था झाली. हे पाहता प्रशांत किशोर यांना पक्षात फ्री हँड हवा होता. स्वतःची कार्यपद्धती लागू व्हावी, असे वाटत होते. त्यामध्ये कोणीही हस्तक्षेप करू नये, तसे असेल तरच आपण काँग्रेसमध्ये येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, प्रशांत किशोर यांना तशी सूट दिली, तर राहुल गांधीचे करायचे काय, हा प्रश्न होता. त्यात प्रशांत किशोर यांचे स्तोम माजले असते. त्यामुळे त्यांच्या पक्ष प्रवेशाला काँग्रेस अनुकुल नव्हती. त्यामुळेच ऐनवेळी प्रशांत किशोर आणि काँग्रेसचे बिनसले.