भारत-पाकिस्तान सीमेवर गोळीबारामुळे अनेक झाडे जळून खाक, जंगल वाचवण्यासाठी ते करताय प्रयत्न
काश्मीरचं सौंदर्य हे तेथील पर्यावरण आहे. पण येथील पर्यावरणाला गेल्या अनेक वर्षात धोका निर्माण झाला आहे. वृक्षतोड वाढत असताना येथील एक रहिवासी मात्र झाडे लावून जंगल वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत.
My India My Life Goal : भारत पाकिस्तान सीमेवर वृक्षारोपण करून मोहम्मद इक्बाल लोन हे काश्मीरचे सौंदर्य वाढवत आहे. त्यांनी काश्मीरच्या सौंदर्य वाढवण्याचा विडा उचलला आहे. इक्बाल लोन म्हणतात की, पाणी, जंगल आणि जमीन याशिवाय जीवन अपूर्ण आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात आपण जास्तीत जास्त झाडे लावण्याचे काम केले पाहिजे. इक्बाल लोन हे जम्मू-काश्मीरमधील उरीचे रहिवासी आहे. काश्मीरचे पर्यावरण वाचवण्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करत आहेत.
काश्मीरची ओळख हे त्यांचं सौंदर्य आहे. त्यामुळेच त्याला पृथ्वीवरील स्वर्ग म्हणतात. परंतु सातत्याने होत असलेले आधुनिकीकरण आणि वाढती लोकसंख्या यामुळे देशातील अनेक भागांतील निसर्ग सौंदर्यावर परिणाम झाला आहे. असेच काहीसे चित्र काश्मीरमध्येही पाहायला मिळत आहे.
उरी येथील रहिवासी इक्बाल लोन यांनी काश्मीरमधील निसर्गाच्या शोषणावर चिंता व्यक्त केली आहे. खोऱ्यात याचं वेगाने शोषण सुरू राहिल्यास जन्नत ही संकल्पनाच उरणार नसल्याचे ते म्हणाले. यामुळेच त्यांनी जंगल वाचवण्यासाठी मोहीम सुरू केलीये. काश्मीरमधील भारत-पाकिस्तान सीमेजवळ उरी येथे राहणारे मोहम्मद इक्बाल लोन गेल्या अनेक वर्षांपासून झाडे लावत आहे. काश्मीरमध्ये ज्या प्रकारे झाडे तोडली जात आहेत, ती चिंतेची बाब असल्याचे ते म्हणतात.
झाडे तोडण्याची प्रक्रिया याच गतीने सुरू राहिली तर काश्मीरमध्ये केवळ स्वर्गाची संकल्पनाच उरणार आहे. स्वर्ग दिसणार नाही. ते म्हणाले की, येथे अनेकदा गोळीबार होत असतो, त्यामुळे अनेक वेळा आगीमुळे जंगल जळून खाक होते. त्यामुळे झाडे लावणे आवश्यक आहे.
मोहम्मद इक्बाल लोन यांनी त्यांच्या एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, जम्मू-काश्मीरमध्ये सुमारे 40-50 टक्के जंगलतोड झाली आहे. ज्यावर हळूहळू नियंत्रण आले आहे. जेव्हा रोपे लावण्याचा हंगाम असतो तेव्हा आम्ही 5000 हून अधिक चिनार झाडे लावण्याचा प्रयत्न करतो. अनेक एकर जागेत झाडे लावण्याचे काम आम्ही केले आहे. आम्ही नियंत्रण रेषेपासून झाडे लावायला सुरुवात केली आणि कारगिलपर्यंत चिनारची झाडे लावली. चिनार वृक्ष लागवडीचा मोठा फायदा असल्याचे त्यांनी सांगितले. ही झाडे सुमारे पाचशे ते सहाशे वर्षे जगतात. ज्यातून आपल्याला अधिक फायदा होतो.
इक्बाल लोन म्हणाले की, आम्ही स्वातंत्र्याचा अमृतोत्सव साजरा करत आहोत. त्यामुळे यासाठी जास्तीत जास्त झाडे लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे.