मी मंदिरात का जातो? ISRO प्रमुखाचं टीकाकारांना जोरदार उत्तर
isro chief Answer : इस्रोच्या प्रमुखांनी मंदिरात जाण्याविषयी थेट उत्तर दिले आहे. शास्त्रज्ञ असून देखील मंदिरात जात असल्याने काही लोकांनी त्यांच्यावर टीका केली होती.
केरळ : चांद्रयान-३ मिशनमुळे इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ चर्चेत आले आहेत. चांद्रयान यशस्वीपणे चंद्रावर उतरल्याने जगभरात इस्रोच्या प्रमुखांची चर्चा आहे. पण या दरम्यानच शास्त्रज्ञ असून देखील ते मंदिरात जातात यावरुन काही लोकांनी आक्षेप घेतला होता. यावर त्यांनी अशा लोकांना उत्तर दिले आहे. इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ म्हणाले की, मला विज्ञान आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टींचा शोध घ्यायचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांद्रयान-3 च्या टचडाउन स्पॉटला ‘शिवशक्ती पॉइंट’ असे नाव देण्यात काहीच गैर नाही, असेही त्यांनी म्हटले.
एस सोमनाथ हे भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) चे अध्यक्ष म्हणून आणि चांद्रयान-3 मोहिमेचे मुख्य व्यक्ती होते. भारताने चंद्रावर सुरक्षितपणे चांद्रयान-३ उतरवल्यानंतर ते चर्चेत आहेत. या मोठ्या यशानंतर इस्रो प्रमुखांनी शनिवारी केरळमधील एका मंदिरात जावून देवाचे दर्शन घेतले.
जेव्हा त्यांना याबाबत विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले की, “मी एक संशोधक आहे. मी चंद्रावर संशोधन करतो. विज्ञान आणि अध्यात्म या दोन्हींचा शोध घेणे हा माझ्या आयुष्यातील प्रवासाचा एक भाग आहे. मी अनेक मंदिरांना भेटी देतो आणि अनेक शास्त्रे वाचतो. मी आपल्या अस्तित्वाचा आणि या विश्वातील प्रवासाचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करतो.
तिरुपती मंदिरात जावून दर्शन
इस्रोच्या शास्त्रज्ञांनी याआधी चांद्रयान-3 मोहिमेच्या आधी आंध्र प्रदेशातील तिरुपती मंदिरात जावून दर्शन घेतले होते. त्यामुळे विज्ञान आणि अध्यात्म यावरुन वाद सुरू झाला होता. एस. सोमनाथ म्हणाले की, अंतर्गत आणि बाह्य दोन्हीचा शोध हा भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे. बाहेरील गोष्टीसाठी मी वैज्ञानिक संशोधन करतो, आतील संशोधनासाठी मी मंदिरात येतो.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं समर्थन
चांद्रयान-३ ज्या ठिकाणी उतरले त्या ठिकाणाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘शिवशक्ती पॉइंट’ असे नाव दिले. त्यावरुन देखील वाद सुरु झाला. यावर देखील त्यांनी उत्तर दिले. एस. सोमनाथ म्हणाले की, “पंतप्रधानांनी त्याचा अर्थ आपल्या सर्वांना योग्य वाटेल अशा पद्धतीने समजावून सांगितला. मला वाटतं त्यात काहीही चुकीचं नाही. त्यांनी पुढचं नाव तिरंगा दिलं आणि दोन्ही भारतीय नावं आहेत. पंतप्रधान असल्याने देश म्हणून, हे नाव देणे हा त्यांचा विशेषाधिकार आहे.