ब्रिजवर रस्ता ओलांडायला गेली अन् जीव गमावून बसली, पनवेल एसटीची महिलेला धडक
रस्ता ओलांडण्यासाठी पादचारी पुलाचा वापर करा, असे नेहमी आवाहन वाहतूक शाखेकडून नागरिकांना करण्यात येते. मात्र वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्याने अपघाताच्या घटना घडतात.
पनवेल : रस्ता ओलांडताना एसटीची धडक बसून एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना पनवेलमध्ये घडली आहे. सोनी गुप्ता असे मयत महिलेचे नाव आहे. पनवेलमधील भिंगारी पुलावर ही घटना घडली. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी एसटी चालकाला ताब्यात घेतले आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. वारंवार जनजागृती करुनही नागरिक गाड्या येत असताना रस्ता ओलांडण्याची चूक करतात. यामुळे अशा अपघाताच्या घटना घडतात.
रस्ता ओलांडताना एसटी धडक बसली
एसटी महामंडळाची एसटी कोकणातील खेडहून मुंबईत येत होती. एसटी पनवेलमधील भिंगारी पुलावजवळ येताच एक महिला रस्ता ओलांडताना एसटी समोर आली. यावेळी एसटीची धडक बसल्याने महिला जागीच ठार झाला. अपघाताची माहिती मिळताच पनवेल शहर पोलीस आणि वाहतूक शाखेचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तात्काळ मदतकार्य सुरु केले. महिलेचा मृतदेह रुग्णालयात पाठवला. एसटी चालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. तसेच महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस अधिक तपास करत आहेत.
औरंगाबादमध्ये खाजगी बसला अपघात
औरंगाबाद जिल्ह्यातील सावंगी जवळ खाजगी बसला अपघात झाल्याची घटना आज सकाळी घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र बसमधील 20 जण जखमी झाल्याची माहिती मिळते. ट्रक आणि खाजगी बसमध्ये हा अपघात झाला. रात्रीच्या सुमारास समृद्धी महामार्गावर पुन्हा सावंगी जवळ अपघातात 9 प्रवासी जखमी झाले असल्याची माहिती मिळते.