तेच मैदान, तीच वेळ… तशीच सभा… उद्धव ठाकरे यांना व्याजासकट उत्तर देणार; रामदास कदम यांची गर्जना
ठाणं, पुणं, नवी मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यातून लोकं आणण्याची प्रचंड तयारी सुरू आहे. जणू काही खेडला दसऱ्याची जाहीर सभाच आहे अशा पद्धतीने ही तयारी सुरू आहे.
खेड : राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज खेडमध्ये सभा होत आहे. शिवसेनेचं नाव आणि चिन्हं शिंदे गटाला गेल्यानंतरची उद्धव ठाकरे यांची ही पहिलीच सभा आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे या सभेतून कुणाकुणाची पिसे काढणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शिवसेना नेते रामदास कदम आणि भाजप नेते नारायण राणे यांचं वर्चस्व असलेल्या कोकणात ही सभा होत असल्याने या दोन्ही नेत्यांवर उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार असल्याचं सांगितलं जात आहे. या सभेला प्रचंड गर्दी होणार असल्याचंही सांगितलं जात आहे. मात्र, शिवसेना नेते रामदास कदम यांनीही त्याच मैदानावरून उद्धव ठाकरे यांना जशास तसं उत्तर देण्याची तयारी सुरू केली आहे. तशी गर्जनाच रामदास कदम यांनी केली आहे.
उद्धव ठाकरे यांना उत्तर देण्यासाठी आपणही त्याच मैदानावर सभा घेणार असल्याचं रामदास कदम यांनी म्हटलं आहे. मीडियाशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली आहे. ठाणं, पुणं, नवी मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यातून लोकं आणण्याची प्रचंड तयारी सुरू आहे. जणू काही खेडला दसऱ्याची जाहीर सभाच आहे अशा पद्धतीने ही तयारी सुरू आहे. ठाकरे गटाने केलेल्या तयारीवरून त्यांनी रामदास कदमचा किती मोठा धसका घेतला हेच सिद्ध होतंय, असं सांगतानाच बाहेरची लोकं आणून इथे राजकारण होत नसतं, असा चिमटा रामदास कदम यांनी काढला आहे.
स्थानिक लोक किती आहेत?
उद्धव ठाकरे येतील, भाषण करतील आणि निघून जातील. पण त्या सभेला इथले स्थानिक किती असणार? दोन चार टक्के तरी आहे का? म्हणून मला त्याची काळजी नाही. त्यांनी यावं, बोलावं, जावं. आम्हाला त्याची काही फिकीर नाही. आम्ही त्यांची नोंदही घेत नाही. पण या सर्वांना उत्तर त्याच ठिकाणी त्याच मैदानावर 19 मार्चला दिलं जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील, शंभुराज देसाई आणि भरत गोगावले या सभेला येणार आहेत. या सभेतून त्याच ठिकाणी उद्धव ठाकरे यांना व्याजासह सर्व उत्तर दिलं जाणार आहे, असं रामदास कदम म्हणाले.
उद्धव ठाकरे यांची डरकाळी
दरम्यान, आज संध्याकाळी उद्धव ठाकरे यांची खेडमधील गोळीबार मैदानावर सभा होणार आहे. या सभेला 30 हजाराहून अधिक लोक उपस्थित राहणार आहेत. त्याची जय्यत तयारी ठाकरे गटाने केली आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर खेडमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 300 पोलीस आणि 50 होम गार्ड खेडमध्ये तैनात करण्यात आले आहेत. तसेच वाहतुकीचे मार्गही बदलण्यात आले आहेत.