एकनाथ शिंदे यांनी माझ्या मुलाला 50 खोके दिले, पण…, रामदास कदम असं का म्हणाले?; ठाकरे गटाची फिरकी घेतली?
मला वाटतं संजय कदम यांचा अभ्यास नाहीये. त्यांची ओळख गावठी आमदार म्हणून आहे. विधीमंडळात पाच वर्षात ते किती वेळा बोलले त्याची माहिती काढा म्हणजे कळेल. मुळात पर्यावरण खात्याला बजेटच नव्हतं.
खेड : शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंड केल्यानंतर या आमदारांनी खोके घेतल्याचा आरोप ठाकरे गटाकडून केला जात आहे. या आरोपावरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून शाब्दिक चकमकीही उडताना दिसत आहे. याच मुद्द्यावरून आता शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी ठाकरे गटाला डिवचण्यास सुरुवात केली आहे. माझ्या मुलालाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 50 कोटींचा विकास निधी दिला. त्यांच्या भाषेत सांगायचं म्हणजे 50 खोके दिले, असं विधान करत रामदास कदम यांनी ठाकरे गटाला डिवचलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या सभेआधीच कदम यांनी ही गुगली टाकून ठाकरे गटावर शरसंधान केलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे त्यावर काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत मी उभा राहणार आणि रामदास कदम यांचा मुलगा आमदार योगेश कदम यांना पाडणार असं आव्हानच संजय कदम यांनी दिलं आहे. संजय कदम यांच्या या आव्हानाचीही त्यांनी खिल्ली उडवली आहे. आगामी निवडणुकीत संजय कदम लढणार आणि 50 हजार मतांनी पडणार, हे लिहून ठेवा. रामदास कदम अख्या महाराष्ट्रात गेले. अख्या महाराष्ट्राच्या लढाया मी लढलोय. माझ्या मुलाला कसं निवडून आणायचं ते मला माहीत आहे, असं रामदास कदम म्हणाले. तसेच उद्धव ठाकरे यांनी कोकणात यावं आणि जावं. त्यामुळे मला काहीच फरक पडत नाही, असंही ते म्हणाले.
लोकांना फक्त विकास हवाय
खेडमध्ये माझ्या मुलाची कामे चांगली आहेत. त्याने खूप चांगली कामे केली आहेत. छान कामे सुरू आहेत. आज जवळजवळ 50 कोटी.. त्यांच्या भाषेत 50 खोके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योगेश कदमला विकास कामासाठी दिले आहेत. विकास कामे दिली आहेत. त्यामुळे विकास केला तर लोक पाठिशी उभे राहतात.
लोकांना विकासाशी मतलब असतो. लोकाना आणखी काय हवंय? असा सवाल त्यांनी केला. हे खोके खोके म्हणतात ना… उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षात किती खोके दिले ते सांगा. त्यांनी सांगावं ना… आमदारांनाच भेटत नव्हते तर निधी द्यायचं दूरच राहिलं. अजित दादांनी त्यांच्या पक्षाचं काम केलं, अशी टीकाही त्यांनी केली.
माझ्या खात्याला बजेटच नव्हतं
पर्यावरण खात्याच्या पैशावर योगेश कदम आमदार झाल्याचा आरोपही संजय कदम यांनी केला होता. त्यावरूनही त्यांनी संजय कदम यांच्यावर टीका केली. मला वाटतं संजय कदम यांचा अभ्यास नाहीये. त्यांची ओळख गावठी आमदार म्हणून आहे. विधीमंडळात पाच वर्षात ते किती वेळा बोलले त्याची माहिती काढा म्हणजे कळेल. मुळात पर्यावरण खात्याला बजेटच नव्हतं. ज्या खात्याला बजेट नव्हतं. ते खातंही कधीच नव्हतं. ते खातं वेगळं कधी नव्हतं. वन आणि पर्यावरण असं एकत्र खातं असायचं. ते पर्यावरण बाजूला केलं. मला काही तरी द्यायला पाहिजे म्हणून ते खातं देऊन उद्धवजींनी मला बसवलं, असं कदम म्हणाले.
माझ्या पर्यावरण खात्याला शून्य बजेट होता. पण अनेक ठिकाणी तलावांचं सुशोभिकरण करण्याचं काम मी केलं, देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांना सांगून मी निधी घेतला आणि कामं केली. या सर्व प्रश्नावर संजय कदम यांना बाप दाखवा किंवा श्राद्ध घालावं लागणार आहे. याप्रकरणी मी न्याायलयात जाईल आणि त्यांच्यावर मानहानीचा अब्रुनुकसानीचा दावा करेल, असा इशाराही त्यांनी दिला.