VIDEO : 3 गाण्यासाठी 3 लाख घेते, इंदुरीकर महाराजांच्या आरोपावर गौतमी पाटील हिची पहिलीच प्रतिक्रिया; म्हणाली, महाराजांचा…
प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिने पहिल्यांदाच निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या टीकेवर प्रतिक्रिया दिली आहे. मला तीन गाण्यासाठी तीन लाख मिळतात असं महाराज म्हणतात. त्यांचा काही तरी गैरसमज झाला आहे, असं ती म्हणाली.
सोलापूर : प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिच्यावर इंदुरीकर महाराज यांनी टीका केली होती. गौतमी पाटील तीन गाण्यासाठी तीन लाख रुपये घेते. आम्ही फक्त 5 हजार रुपये वाढवून मागितले तर बाजार मांडल्याचा आरोप होतो. गौतमीच्या कार्यक्रमात राडा होतो. मुलांचे ढोपर फुटतात. पोलिसांना बंदोबस्त ठेवावा लागतो. गौतमीला संरक्षण दिलं जातं. आम्हाला संरक्षण नसतं, अशी टीका इंदुरीकर महाराज यांनी केली होती. इंदुरीकर महाराज यांच्या या टीकेवर गौतमी पाटील हिने काहीच प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र, सोशल मीडियातून इंदुरीकर महाराज यांच्यावर प्रचंड टीका झाली होती. त्यांच्याविरोधातील मिम्सही व्हायरल झाले होते. मात्र गौतमीने पहिल्यांदाच इंदुरीकर महाराज यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेतला आहे.
ते महाराज आहेत. मी काय बोलणार त्यांच्याविषयी. फक्त गैरसमज नका करू. महाराजांचा गैरसमज झाला आहे. ते सांगतात तेवढं मानधन नाही. हे प्रेक्षकांनी ही ध्यानात घ्यावं. मी तिन गाण्याला तीन लाख रुपये घेतले असते तर लोकांनी माझ्या कार्यक्रमाचे आयोजनच केले नसते. आमच्या टीममद्ये 11 मुली असतात. एकूण 20 जणांची आमची टीम आहे. या सर्वांचा खर्च मोठा आहे. त्यामुळे मानधन आम्ही घेतो. पण महाराज सांगतात तेवढं घेत नाही. आणि तीन गाण्यासाठी तीन लाख रुपये कोणीही देणार नाही, असं गौतमी पाटील म्हणाले.
प्रेक्षकांमुळेच उभी आहे
माझ्या कार्यक्रमाला मोठी गर्दी होत असते. प्रेक्षक उपस्थित राहून एन्जॉय करतात. इतकी मोठी गर्दी होत असेल तर मी माझ्यासाठी मला संरक्षण मागणारच ना? महाराजच नव्हे तर कुणीही काही बोललं, टीका केली तरी माझं काम सुरt आहे. मला काही अडचण नाही. कारण मी कशी आहे हे माझं मला माहिती आहे. मी मानधन किती घेते ते मला माहीत आहे. कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांना माहीत आहे. आज मी पुन्हा उभी राहीलीय. ती फक्त प्रेक्षकांमुळेच. प्रेक्षकांनी मला कोणत्याही गोष्टी जाणवू दिल्या नाहीत. महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी सपोर्ट केल्यामुळे मी जिद्दीने अडचणीच्या काळात उभा राहिलीय, असंही ती म्हणाली.
गौतमी सिनेमात
दरम्यान, गौतमी पाटील पहिल्यांदाच मराठी सिनेमात दिसणार आहे. घुंगरू असं या सिनेमाचं नाव आहे. घुंगरू सिनेमाच्या माध्यमातून तिचं मोठ्या पडद्यावर आगमन होत आहे. माढ्यात या सिनेमाचं शेवटचं चित्रीकरण पूर्ण झालं आहे. या सिनेमाकडून गौतमीला प्रचंड अपेक्षा आहेत. याविषयी ती भरभरून बोलली. लोककलावंताची व्यथा मांडणारा घुंगरू महाराष्ट्रातील प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. कलाकारांना प्रोत्साहन देण्याचं काम प्रेक्षक करत असतात. प्रेक्षकांमुळेच आज मी उभी आहे. माझ्यावर जसं प्रेम केलं तसं महाराष्ट्रातील चाहत्यांनी घुंगरु चित्रपट पाहून प्रेम दाखवावं, असं आवाहन करतानाच चित्रपटात अभिनय करताना अनेक अनुभव आले, अशी माहिती तिने दिली.