अकोल्यातील हिंसा कशामुळे भडकली? इन्स्टाग्रामवरील पोस्ट कुणाच्या विरोधात?; हिंसाचाराचं कारण आलं समोर
अकोल्यात काल रात्री उसळलेल्या हिंसाचारात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर आठजण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये दोन पोलिसांचाही समावेश आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून हल्लेखोरांचा शोध घेत आहे.
अकोला : अकोल्यात काल रात्री दोन गटात तुफान हाणामारी झाली. दोन्ही गटाने तुफान दगडफेक करत जाळपोळ केली. 100 बाईकस्वार अचानक रस्त्यावर उतरले. त्यांनी दहशत माजवण्यास सुरुवात केली. त्यामुळे पोलिसांना या संतप्त जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. तसेच पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. आता अकोल्यात तणावपूर्ण शांतता आहे. या हिंसाचारात आठ लोक जखमी झाले आहेत. एकाचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी आज सकाळीही संवेदनशील भागात शांती मार्च काढला. अकोल्यात चौकाचौकात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
अकोल्यातील हिंसाचारामागचं नेमकं कारण समोर आलं आहे. इन्स्टाग्रामवर एका समुदायाच्या धर्मगुरू विरोधात अत्यंत घाणेरडी पोस्ट टाकण्यात आली होती. त्याला काही लोकांनी आक्षेप घेतला. पोलिसात जाऊन तक्रारही नोंदवली. मात्र, त्यानंतर अचानक जमाव भडकला. या जमावाने थेट वाहनांची तोडफोड करत जाळपोळ करण्यास सुरुवात केली. त्यामुळे दुसऱ्या समुदायाचे लोकही रस्त्यावर उतरले. त्यांनीही दगडफेक करण्यास सुरुवात केली. या समाजकंटकांनी पोलिसांच्या वाहनांवरही जोरदार दगडफेक केली. त्यामुळे पोलिसांना जमावाला पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. तसेच हवेत गोळीबारही करावा लागला.
अचानक उत्पात सुरू झाला
अकोल्यातील गंगाधर चौक, पोळा चौक, हरिहर पेठमध्ये ही हिंसा भडकली. अचानक 100 बाईकस्वार रस्त्यावर आले. त्यानंतर या बाईकस्वारांनी उत्पात सुरू करण्यास सुरुवात केली. जोरदार तोडफोड आणि जाळपोळ करत या बाईकस्वारांनी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्याची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळी येत समाजकंटकांना पांगवण्याचा प्रयत्न केला. पण तरीही ते हटण्यास तयार नव्हते.
अखेर पोलिसांना लाठीमार करावा लागला. पोलीस जमावाला पांगवत असताना पोलिसांच्या दिशेनेही दगडफेक करण्यात आली. त्यामुळे पोलिसांना या जमावाला पांगवण्यासाठी हवेत गोळीबार करावा लागला. पोलिसांनी हवेत 12 राऊंड फायरिंग केली.
घराघरात छापेमारी
पोलिसांनी अकोल्यात 144 कलम लागू केलं आहे. तसेच नाक्यानाक्यावर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दगडफेक करणाऱ्यांची ओळख पटवली जात आहे. या दगडफेक करणाऱ्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी छापेमारी सुरू केली आहे. मात्र, सध्या अकोल्यातील परिस्थिती नियंत्रणात आहे.
एकाचा मृत्यू
अकोल्यात तणावपूर्ण शांतता आहे. संपूर्ण शहरात रस्त्यावर सन्नाटा पसरला आहे. शुकशुकाट झाला आहे. फेक बातम्या आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे. तसेच पोलिसांनी फ्लॅग मार्च काढत लोकांना शांत राहण्याचं आवाहन केलं आहे. या हिंसाचारात आतापर्यंत एकाचा मृत्यू झाला आहे. या व्यक्तिची ओळख पटली नाही. मात्र, या व्यक्तिच्या मृत्यूचं नेमकं कारण काय याचा पोलीस शोध घेत आहेत. तसेच या हिंसाचारात आठ जण जखमी झाले आहेत. त्यात दोन पोलिसांचा समावेश आहे.