अखेर कांदा लिलाव सुरू, कांदा खरेदी आणि भावाबाबत केंद्रीय मंत्र्यांची मोठी घोषणा; पण शेतकरी मागण्यांवर ठाम
कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द करुन कांद्याला कायमस्वरुपी हमीभाव देण्यात यावा, यामागणीसाठी काँग्रेसने आंदोलन छेडलं आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली पुणे-नाशिक महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
लासलगाव | 23 ऑगस्ट 2023 : केंद्र सरकारच्या निर्यात शुल्क विरोधात कांदा व्यापाऱ्यांनी पुकारलेला बंद अखेर मागे घेतला आहे. त्यामुळे सोलापूरमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा लिलावाला सुरुवात झाली आहे. तर लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतसह राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये उद्यापासून कांदा लिलाव सुरू होणार आहे. मात्र, कांदा लिलाव सुरू असला तरी शेतकरी आपल्या मागण्यांवरून तसूभरही मागे हटलेले नाहीत. त्यांनी कांद्याला 2800 रुपये भाव देण्याची मागणी लावून धरली आहे. तर, केंद्र सरकार 2 लाख टन कांदा खरेदी करणार असून शेतकऱ्यांना 2 हजार 410 प्रतिक्विंटल भाव देणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी केली आहे.
जनहित शेतकरी संघटनेच्या आंदोलनानंतर देखील सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे लिलाव सुरू झाले आहेत. बाजार समितीत कांद्याची आवक घटली असून दर कांद्याच्या भावात थोडी वाढ झाली आहे. मध्यम दर्जाच्या कांद्याला 1800 ते 2300 रुपये दरम्यान भाव तर उच्च प्रतीच्या कांद्याला 2500 ते 2900 रुपये भाव मिळत आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत आज 100 गाडी कांद्याची आवक झाली . पोलिसांनी आंदोलक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर लिलाव सुरळीत सुरू झाल्याची माहिती कांदा व्यापारी सादिक बागवान यांनी दिली आहे.
लासलगावात उद्यापासून लिलाव
केंद्र सरकारच्या निर्यात शुल्क विरोधात कांदा व्यापाऱ्यांनी लिलाव बंद पुकारला होता. गेल्या तीन दिवसांपासून कांदा लिलाव बंद आहे. या पार्श्वभूमीवर आज लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील कार्यालयात सभापती, संचालक व कांदा व्यापाऱ्यांची बैठक संपन्न झाली. यावेळी उद्यापासून कांद्याची नगरी असलेल्या लासलगाव येथे लिलाव पूर्ववत सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दोन लाख टन कांदा खरेदी करणार
दरम्यान, कांदा प्रश्नी केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांच्या यांनी आज आढवा बैठक घेतली. नाशिक येथे ही बैठक पार पडली. यावेळी नाफेडचे अधिकारी, जिल्हा उपनिबंधक, कांदा व्यापारी आणि शेतकरी बैठकीला उपस्थित होते. आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. शेतकऱ्यांना नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून 2 लाख टन कांदा खरेदी करण्यात येणार आहे. तसेच 2 हजार 410 प्रतिक्विंटल भावही शेतकऱ्यांना देण्यात येईल, अशी घोषणा करतानाच शेतकऱ्यांनी बाजार समित्या खुल्या करून खरेदी-विक्री सुरू करण्याचे आवाहन भारती पवार यांनी केलं.
उद्यापासून संपूर्ण बाजार समितीत लिलाव सुरू
शेतकरी आणि व्यापारी असोसिएशन सोबतची बैठक झाली आहे. व्यापारी असोसिएशनने उद्यापासून कांदा लिलाव सुरू करण्याचं मान्य केलंय. उद्यापासून बाजार समितीत कांदा लिलाव सुरू होतील. नाफेडने कांद्याला 2410 रुपये भाव दिलाय. व्यापाऱ्यांनी देखील शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला भाव द्यावा. नाफेड जिथे खरेदी करेल. तिथली माहिती बाजार समितीत देखील मिळेल. बाजार समितीत नाफेड आपल्या खरेदी केंद्राचा बोर्ड लावेल. सीमेवर आणि बंदरावर अडकलेल्या कांद्याची माहिती घेवून केंद्र सरकार त्यावर तोडगा काढेल, असं भारती पवार म्हणाल्या.
40 टक्के निर्यात शुल्क बाबत फेरविचार करण्याची केंद्राला विनंती केली आहे. आम्ही सर्व लोकप्रतिनिधी सकारात्मक फेरविचार करण्यासाठी केंद्र सरकारला भाग पाडू. उद्यापासून लिलाव सुरू होईलच, मात्र आज जर दुपारपासून लिलाव सुरू करता आले, तर करावेत ही व्यापाऱ्यांना विनंती करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.
पवार यांच्या मध्यस्थीने…
भारती पवार यांच्या मध्यस्थीने उद्यापासून कांदा लिलाव सुरू करत आहोत. सीमेवर आणि बंदरात अडकलेल्या कांद्याबाबत सरकारकडून तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आलंय, अशी माहिती व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष खंडू मोरे यांनी दिली.
कृषी मंत्र्याच्या घरासमोर बोंबाबोंब आंदोलन करणार
जनहित शेतकरी संगटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी मीडियाशी संवाद साधताना या प्रश्नावर थेट कृषी मंत्र्यांनाच धारेवर धरलं आहे. निर्यात शुल्क कमी करण्यासाठी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिल्लीत जाऊन मागणी करावी. दोन दिवसात निर्यात शुल्क माफी न झाल्यास कृषी मंत्र्यांच्या बीड येथील घराबाहेर बोंबाबोंब आंदोलन करणार असल्याचा इशारा प्रभाकर देशमुख यांनी दिला आहे.
लिलाव बंद पाडण्याचा प्रयत्न
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव बंद पाडण्यासाठी जनहित शेतकरी संघटनेतर्फे आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रभाकर देशमुख यांनी हा इशारा दिला. जनहित शेतकरी संघटनेने कांदा लिलाव बंद पाडण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर आजल मार्केट यार्डाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जनहितच्या कार्यकर्त्यांनी यार्डात घुसून कांदा लिलाव बंद पाडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आंदोलकांना पोलिसांना पांगवलं. कांदा निर्यात शुल्क कमी करावं, या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं होतं.
तो भाव नकोच
आम्हाला वाटले कृषीमंत्री केंद्रात जाऊन निर्यात शुल्क कमी करून आणतील. मात्र ते अजित पवारांना मुख्यमंत्री करावे या मागणीसाठी गेले होते, असा खोचक टोला लगावतानाच मोदींच्या नजरेत महाराष्ट्राची काय किंमत आहे हे काल कळले. आम्ही निर्यात शुल्क कमी करावी अशी मागणी करतोय. मात्र केंद्र सरकारने आम्हाला नाफेड खरेदीचे आश्वासन दिले आहे. मुळात आम्हाला बाजारात 2800 रुपये भाव मिळतोय. मात्र केंद्र सरकार 2410 रूपये भाव देत आहे. त्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतोय, असं देशमुख म्हणाले.
केंद्रीय मंत्र्याच्या घरात कांदा फेकू
हिंगोलीत कांदा आंदोलन चांगलंच पेटलं आहे. सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे शेतकऱ्यांनी चक्क कांदा पेटून सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे. सरकारने 40% निर्यात शुल्क धोरण लावून शेतकऱ्यांना आत्महत्याच्या उंबरठ्यावर उभे केल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे. यावेळी कांद्याला भाव मिळाला पाहिजे अशा घोषणाही आंदोलकांनी दिल्यात. कांद्यावरील 40 % निर्यात शुल्क मागे घ्या, अन्यथा केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांच्या दिल्लीतील घरात कांदा फेकणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.
नाशिकमध्ये शरद पवार गट आक्रमक
शरद पवार गटाने नाशिकच्या शिंदे पळसे येथे रास्ता रोको आंदोलन केलेय. केंद्र सरकारने निर्यात शुल्क लावण्याचा निर्णय मागे घ्यावा, नाशिक जिल्हा दुष्काळी जाहीर करावा, शेतकऱ्यांना वीज बिल माफी द्यावी, यांसह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.