इंडिया आघाडीतील ‘त्या’ पदावर ठाकरे गटाचं वेगळं मत? पर्यायी सूचवला; मुंबईत मोठा निर्णय होणार?
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे इंडिया आघाडीच्या संयोजक पदासाठी आग्रही आहेत. तशी इच्छाही त्यांनी खासगीत बोलून दाखवली आहे. त्यामुळे नितीश कुमार यांच्याकडे हे पद जाण्याची चर्चा होती.
मुंबई | 14 ऑगस्ट 2023 : ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस इंडिया आघाडीची मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीत लोकसभा निवडणुकीची रणनीती ठरवली जाणार आहे. जागा वाटपाच्या अनुषंगाने या आघाडीकडून महत्त्वाचा निर्णय घेतला जाणार असल्याने या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र, इंडिया आघाडीतील एका पदावरून या बैठकीत मोठा खल होण्याची शक्यता आहे. या पदावर ठाकरे गटाने वेगळं मत व्यक्त केलं आहे. त्यामुळे या पदावर खल वाढणार की या पदाचा तिढा सुटणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
उद्धव ठाकरे यांच्या गटाने इंडिया आघाडीतील संयोजक पदावर वेगळं मत मांडलं आहे. इंडिया आघाडीचं संयोजक पद हे कोणत्याही पक्षाच्या पक्षप्रमुखाला देऊ नये, असं मत उद्धव ठाकरे गटाने व्यक्त केल्याचं सूत्रांनी सांगितलं. लोकसभा निवडणुकीत पक्षप्रमुख आपआपल्या पक्षाची रणनीती ठरवण्यात व्यस्त असतात. तिकीट वाटपांपासून ते उमेदवार निवडीपर्यंतच्या अनेक कामात पक्षप्रमुख व्यस्त असतात. काही नाराजांची मनधरणीही त्यांना करावी लागते. त्यामुळे कोणत्याही पक्षाचा प्रमुख इंडिया आघाडीला तितकासा वेळ देऊ शकेल का? हा प्रश्न आहे. त्यामुळेच इंडिया आघाडीचं महत्त्वाचं असं संयोजक पद पक्षप्रमुखाला देऊ नये, असं मत ठाकरे गटाने व्यक्त केलं आहे.
दुसऱ्या फळीतील नेत्याला…
इंडिया आघाडीचं संयोजक पद पक्षप्रमुखाला देण्याऐवजी दुसऱ्या फळीतील नेत्याला देण्यात यावं, असं मतही उद्धव ठाकरे गटाने व्यक्त केलं आहे. त्यामुळे इंडिया आघाडीचे नेते त्यावर काय प्रतिक्रिया व्यक्त करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. इंडिया आघाडीची येत्या 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीत इंडिया आघाडीच्या संयोजक पदावर चर्चा होऊन अंतिम निर्णय होणार असल्याची चर्चा आहे. मात्र, ठाकरे गटाने वेगळीच भूमिका मांडल्याने आघाडीतील 26 पक्षाचे नेते काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
समिती नेमणार?
संयोजक पदाबाबतची ठाकरे गटाची सूचना अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे मुंबईतील बैठकीत या सूचनेवर गंभीर विचार केला जाऊ शकतो. संयोजक पद एका व्यक्तीला देण्याऐवजी एक समिती स्थापन करून निर्णय घेण्याबाबतही निर्णय घेतला जाऊ शकतो, असे कयासही वतर्वले जात आहेत.
नितीश कुमार यांचा पत्ता कट होणार?
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे इंडिया आघाडीच्या संयोजक पदासाठी आग्रही आहेत. तशी इच्छाही त्यांनी खासगीत बोलून दाखवली आहे. त्यामुळे नितीश कुमार यांच्याकडे हे पद जाण्याची चर्चा होती. मात्र, आता ठाकरे गटाने वेगळी भूमिका घेतल्याने नितीश कुमार यांच्या संयोजक पदाच्या स्वप्नावर गडांतर येण्याची शक्यता आहे.
नितीश कुमार हे जनता दलाचे पक्षप्रमुख नाहीत. पण त्यांच्या पक्षाची सर्व धोरणे आणि निर्णय तेच घेतात. शिवाय ते बिहारचे मुख्यमंत्री असल्याने त्यांच्यावर एका राज्याची जबाबदारी आहे. त्यामुळे ते संयोजक पदाला न्याय देऊ शकतात का? असा सवाल निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कुणाला हे पद मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.