मुंबई | 28 ऑगस्ट 2023 : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गंभीर आरोप केला आहे. एकनाथ शिंदे असो की अजितदादा असो ते भाजपच्या लिखित अजेंड्यावर काम करत आहेत. त्यांच्या तोंडी वाक्य टाकली जात आहेत. उद्धव ठाकरे यांच्याविरोधात काही बोलायचं असेल तर त्यांना लिहून दिलं जातं. शरद पवार यांच्या विरोधात काही बोलायचं असेल, लिहायचं असेल तर तेही त्यांना लिहून दिलं जातं, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.
आम्ही फुले-आंबेडकर यांची विचारधारा घेऊन जात असल्याचं अजित पवार वारंवार सांगत आहेत. त्यावरही संजय राऊत यांनी टीका केली. फुले-आंबेडकरांचे विचार कुठे आहेत? द्वेषाच्या भाषणा शिवाय काय आहे? लोकांमध्ये भांडणं लावली जात आहेत. फुले-शाहू-आंबेडकरांची विचारधारा घेऊन जात असल्याचं अजितदादा म्हणत आहेत. भाजपमध्ये ती विचारधारा कुठे आहे?, असा सवालच संजय राऊत यांनी अजितदादा यांना केला आहे.
आपल्या गटासोबत जे जे आले त्यांना शंभर कोटींचा निधी आणि त्यांचाच विकास ते करत आहेत. बाकीच्या आमदारांना तुम्ही कवडी देत नाही. हा कुठला विकास आहे? हजारो कोटींची लूट या निधीच्या मार्फत महाराष्ट्रात होत आहे. या लुटीची बरोबरी मी मेहुल चौक्सी, नीरव मोदी आणि विजय मल्ल्या यांच्या लुटी सोबत करतो, असंही ते म्हणाले. सबका साथ सबका विकास तुम्ही म्हणता मग तसा विकास झाला पाहिजे. या लुटीची चौकशी व्हायला हवी. माझं अमित शाह यांना आव्हान आहे. करा चौकशी, असंही ते म्हणाले.
तुम्हाला महाराष्ट्राचा विकास करायचा आहे तर महाराष्ट्राच्या काही विशेष भागाचा विकास का करत आहात? आपण राज्याचे अर्थमंत्री आहात, राज्याचे मुख्यमंत्री आहात, आपण राज्याचे गृहमंत्री आहात, आपण राज्यात नियोजन मंत्री आहात, तरीही तुमच्यासोबत आलेल्यांचाच विकास का करत आहात. इतर भागांचा विकास करण्यासाठी निधी का दिला जात नाही? ते राज्यातील लोक नाहीत का? असा सवाल त्यांनी केला.
यावेळी संजय राऊत यांनी अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. 2024 नंतर तुम्ही कोणाचे नेतृत्व स्वीकारणार? 2024 नंतर या देशात आणि राज्यात सत्ता परिवर्तन होईल, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.