अजितदादा- शरद पवार यांच्या भेटीची जागा ‘चोर’डिया नावाच्या ठिकाणीच; राज ठाकरे यांची मिश्किल टीका
आताची बैठक ही पुढच्या वर्षीच्या लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुका होणार आहेत, त्या संदर्भातील होती. पण महापालिका निवडणुका होतील असं काही वातावरण वाटत नाही. सध्या राजकीय घोळ झाला आहे.
नंदकिशोर गावडे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 14 ऑगस्ट 2023 : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची परवा उद्योगपती अतुल चोरडिया यांच्या निवासस्थानी भेट झाली. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये अर्धा तास खलबतं झाली. त्यावरून राजकीय राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे. अजित पवार हा माझा पुतण्या आहे. त्यामुळे तो वडीलधाऱ्यांना तो भेटला तर बिघडलं कुठं? असं स्पष्टीकरण शरद पवार यांनी दिलं आहे. तर, नातीगोती घरात. तुम्ही नाती जपणार. एकमेकांसोबत चहा घेणार. आणि कार्यकर्त्यांनी रस्त्यावर एकमेकांची डोकी फोडायची का? असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तर या वादात आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही उडी घेतली आहे. राष्ट्रवादीतील फूट हा शरद पवार यांचाच गेम असल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला आहे.
राज ठाकरे यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांची आज बैठक घेतली. लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीचा या बैठकीत आढावा घेण्यात आला. त्यानंतर राज ठाकरे यांनी मीडियाशी संवाद साधला. शरद पवार यांनी एक टीम आगोदर पाठवली, दुसरी जाईल हे मी तेव्हाच म्हणालो होतो. तुम्ही त्याकडे तेव्हा लक्ष दिलं नाही. हा शरद पवार यांचाच गेम आहे. हे आतून एकमेकांना मिळाले आहेत. 2014पासून हे सर्वजण एकमेकांना मिळालेले आहेत. फक्त शरद पवार आणि अजित पवार यांना भेटायची जागा ‘चोर’डीया या नावावर मिळाली ही कामाल आहे, असा चिमटा राज ठाकरे यांनी काढला.
लोकसभेच्या तयारीला लागा
यावेळी राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या कामाला लागा, असे आदेश पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. आताची बैठक ही पुढच्या वर्षीच्या लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुका होणार आहेत, त्या संदर्भातील होती. पण महापालिका निवडणुका होतील असं काही वातावरण वाटत नाही. सध्या राजकीय घोळ झाला आहे. त्यामुळे महाालिका निवडणुका होतील आणि धोंडा पाडून घेतील असं वाटत नाही. लोकसभेच्याच निवडणुका लागणार आहेत. त्यामुळे पदाधिकाऱ्यांना मतदार संघांची चाचपणी करण्यास सांगितलं आहे. प्रत्येक मतदारसंघात मनसेची टीम जाईल आणि काम करेल. काय काम करायचं ते त्यांना सांगितलं आहे. उद्या परवा त्यांच्या हातात कार्यक्रम दिला जाईल, असं राज ठाकरे म्हणाले.
परिस्थिती पाहून निर्णय
युती आणि आघाडी करायची की नाही या गोष्टी परिस्थितीनुसार ठरतात, असं राज ठाकरे म्हणाले. सरकार काय सगळीकडे कन्फ्यूजन आहे. कोण कुणाचा आहे हे कळत नाही. उलटा फिरल्यावर कोणत्या पक्षाचा आहे हे कळतं, असं सांगतानाच परवा पनवेलला मेळावा आहे. तिथे जे बोलायचं आहे ते बोलेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.