“देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राने सुवर्णकाळ पाहिला, ते पुन्हा यावेत ही जनतेची इच्छा”
Anil Bonde on Devendra Fadnavis : महाराष्ट्राचं मुख्यमंत्रिपद, देवेंद्र फडणवीस अन् जनतेची भावना; भाजप नेत्याचं लक्षवेधी वक्तव्य
अमरावती : निवडणूक होती 2019 ची. राज्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती. प्रचार शिगेला पोहोचला होता. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांचं एक विधान प्रचंड चर्चेत आलं होतं. 2014 ला भाजपची सत्ता आल्यावर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. अन् पुन्हा एकदा ते राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील, असा अंदाज राजकीय अभ्यासक सांगत होते. अशातच “मी पुन्हा येणार”, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यांचं ते वक्तव्य प्रचंड गाजलं अन् युती बहुमतात आली. पण पुढे जे झालं ते आपण सगळेच जाणतो. पण काही दिवसांआधी देवेंद्र फडणवीस यांनी “मी पुन्हा येणार” चा उल्लेख केला आणि हे विधानाचा पुन्हा चर्चेत आलं आहे.
खासदार अनिल बोंडे यांनी आज पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्या या विधानाशी सलग्न वक्तव्य केलंय. देवेंद्र फडणवीस पुन्हा यावे ही महाराष्ट्रातील जनतेची इच्छा आहे, असं ते म्हणाले आहेत.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना या महाराष्ट्राने सुवर्णकाळ पाहिला.कुठलाही डाग लागू देता पाच वर्ष देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून चांगले काम केलं. मात्र अडीच वर्षात महाविकास आघाडीने हे काम पुसण्याचं काम केलं, असा घणाघात अनिल बोंडे यांनी महाविकास आघाडीवर केला आहे.
दरम्यान, मी पुन्हा येणार म्हटलं की येतोच!, असं देवेंद्र फडणवीस काही दिवसांआधी म्हणाले होते.
बारसु रिफायनरी प्रकल्प, समृद्धी महामार्गात अडथळे आणण्याचं काम महाविकास आघाडी करत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला वाटतं की मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व्हावेत, असं अनिल बोंडे म्हणालेत.
कोण सांगत आहे 16 आमदार अपात्र होत आहेत? सर्वोच्च न्यायालयाचे निकाल असे लिक होत असतात का? असं म्हणत अनिल बोंडे यांनी खासदार संजय राऊत यांना प्रश्न विचारला आहे.
संजय राऊत हे तोंड फाटेपर्यंत राष्ट्रवादीची स्तुती करत होते. सामनाच्या आजच्या अग्रलेखात त्याच राष्ट्रवादीचे तुकडे पाडण्यासाठी संजय राऊत अग्रलेख लिहित आहेत, हा दुटप्पीपणा आहे, असं बोंडे म्हणालेत.
सामनाच्या अग्रलेखातून अजित पवार यांना टार्गेट केलं जात आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम संजय राऊत करत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची अस्वस्थता सर्वाधिक ही महाविकास आघाडीत आहे. संजय राऊत यांना फोडाफोडीचं काम जमतं. त्यामुळे राष्ट्रवादीलाही ते फोडणार आहे, असं टीकास्त्र अनिल बोंडे म्हणाले आहेत.