Salman Khan – Karan Johar | तब्बल 25 वर्षानंतर सलमान खान-करण जोहर येणार एकत्र ? ख्रिसमसला होणार धमाका !
'टायगर 3' या अभिनेता सलमान खानच्या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट बघत आहेत. तो लवकर त्यांच्या भेटीस येणार आहे. मात्र त्यापूर्वी च सलमानच्या नव्या चित्रपटाबद्दलही माहिती समोर आली आहे.
मुंबई | 8 ऑगस्ट 2023 : बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) याच्या ‘टायगर 3’ चित्रपटाची बऱ्याच काळापासून चर्चा सुरू आहे. 10 नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असून यामध्ये सलमानचा पुन्हा एकदा ॲक्शन अवतार पहायला मिळणार आहे. याशिवाय सलमान आता आणखी एका ॲक्शन फिल्मच्या निमित्ताने चर्चेत आला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विष्णू वर्धन करणार असून करण जोहर (Karan Johar) त्याचा प्रोड्युसर असेल, अशी माहिती समोर येत आहे.
पिंकव्हिलाच्या एका रिपोर्टनुसार, सलमान , करण जोहर आणि विष्णू वर्धन हे गेल्या सहा महिन्यांपासून एका ॲक्शन मूव्हीबद्दल चर्चा करत आहेत. टायगर 3 नंतर सलमान या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग याच वर्षी नोव्हेंबर मध्ये सुरू होणार असून ते वेगवेगळ्या शेड्यूलमध्ये 7 ते 8 महीने चालेल असे समजते. एवढेच नव्हे तर चित्रपटाच्या प्री-प्रोडक्शनचे कामकाजही याच महिन्यात सुरू होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
कधी रिलीज होणार चित्रपट ?
याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नसली तरी रिपोर्टनुसार, हा चित्रपट 2024 सालच्या ख्रिसमसमध्ये थिएटरमध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे. विष्णू वर्धन हे साऊथमधील लोकप्रिय दिग्दर्शक आहेत. सलमानसोबत त्यांनी हा चित्रपट केला तर त्यांचा हा हिंदीतील दुसरा चित्रपट ठरेल. यापूर्वी त्यांनी 2021 साली आलेल्या ‘शेरशाह’ या सुपरहिट चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते, त्यामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांची प्रमुख भूमिका होती.
25 वर्षांनी एकत्र येणार सलमान-करण
1998 साली करण जोहर याचा ‘कुछ कुछ होता है ‘ चित्रपट रिलीज झाला होता. त्यामध्ये शाहरूख खान, काजोल आणि राणी मुखर्जी झळकले होते. सलमान खाननेही या चित्रपटात भूमिका केली होती. तो त्याचा कॅमिओ रोल होता. त्यानंतर आता तब्बल 25 वर्षांनी सलमान खान आणि करण जोहर एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे. यावर्षी आलेल्या शाहरूख खानच्या पठाण मध्येही सलमानने कॅमिओ रोल केला होता. तर त्याच्या टायगर 3 मध्ये शाहरूख खानचा कॅमिओ असल्याची चर्चा आहे. या चित्रपटात सलमानसह अभिनेत्री कतरिना कैफही प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.