Karnataka Election Results : खोके, फोडाफोडीला लगाम, कर्नाटकातील निकालाने कुणाला टेन्शन?; महाराष्ट्रातही पुनरावृत्ती होणार?
कर्नाटकात सत्ता परिवर्तन झालं आहे. राज्यातील जनतेने काँग्रेसला कौल दिला आहे. जे कर्नाटकात घडलं तेच महाराष्ट्रात घडू शकतं अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
मुंबई : कर्नाटकात काँग्रेसचा प्रचंड विजय झाला आहे. गेल्या आठ वर्षात एखाद्या राज्यात मिळवलेला काँग्रेसने हा सर्वात मोठा विजय आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिळालेला हा विजय काँग्रेससाठी बळ देणारा आहे. कर्नाटकातील जनतेने भाजपला पूर्णपणे नाकारले आहे. कानडी जनतेने भाजपच्या फोडाफोडी आणि खोक्याच्या राजकारणाला पूर्णपणे झिडकारलं आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही हेच विश्लेषण केलं. त्यामुळे जे कर्नाटकात घडलं, तेच महाराष्ट्रात घडेल काय? अशी चर्चा आता सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील जनताही फोडाफोडीच्या राजकारणाला तिलांजली देणार काय? असा सवालही केला जात आहे.
2018ला काय झाले?
2018च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 104 जागा मिळाल्या होत्या. तर काँग्रेसला 76, जेडीएसला 37 जागा मिळाल्या होत्या. सर्वात मोठा पक्ष असूनही बहुमत नसल्याने भाजपला सरकार स्थापन करता आलं नव्हतं. त्यामुळे राज्यात काँग्रेस आणि जेडीएसचं सरकार आलं. जेडीएसच्या जागा कमी असतानाही काँग्रेसने जेडीएसला मुख्यमंत्रीपद दिलं होतं. मात्र, नंतर भाजपने काँग्रेस आणि जेडीएसचे 17 आमदार फोडले. त्यामुळे राज्यातील काँग्रेस-जेडीएसचं सरकार गेलं.
या 17 आमदारांनी आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपच्या तिकीटावर 17 पैकी 15 जण निवडून आले होते. राज्यात भाजपचं सरकार स्थापन झालं होतं. बीएस येडियुरप्पा हे मुख्यमंत्री झाले होते. या 17 आमदारांना फोडण्यात येडियुरप्पा यांचा मोठा हात असल्याचं सांगितलं जात होतं. तसेच आमदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी घोडेबाजार झाल्याची चर्चा होती. काँग्रेसचं सरकार असताना भाजपने फोडाफोडी करून पैसा आणि सत्तेच्या बळावर आमदारांना फोडल्याचं कानडी जनतेला पटलेलं नव्हतं. त्याचेच परिणाम आजच्या निकालातून दिसून आले आहेत. कानडी जनतेने काँग्रेसला पूर्ण बहुमत दिलं आहे.
महाराष्ट्रात काय घडलं?
महाराष्ट्रातही एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केलं. शिवसेनेचे 40 आणि अपक्ष दहा असे 50 आमदार घेऊन त्यांनी भाजपशी हातमिळवणी केली आणि मुख्यमंत्री झाले. त्यावेळीही मोठा घोडेबाजार झाल्याचं सांगितलं जातं. विरोधकांनी तर शिंदे सरकारला खोके सरकारचं संबोधायला सुरुवात केली आहे. शिंदे यांचं बंड एवढ्यावरच थांबलं नाही. त्यांनी आमदारांना फोडतानाच शिवसेनेवर दावा केला. शिवसेनेचं पक्ष चिन्ह आणि नावही मिळवलं.
बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन केली. वाढवली आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेनेची धुरा दिली. तरीही शिवसेना फोडण्यात आली. आज ठाकरे कुटुंब शिवसेनेचं नाव आणि चिन्ह वापरू शकत नाही. अशा प्रकारचं राजकारण इथल्या लोकांनाही पटलेलं नाही. म्हणूनच जे कर्नाटकात झालं, ते उद्या महाराष्ट्रातही घडू शकतं, असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. आजच्या कर्नाटकातील निकालांनी राज्यातील सत्ताधाऱ्यांनाही टेन्शन आलं असेल, असंही राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे.