Karnataka Election Results 2023 : काँग्रेसला बहुमत ! पहिल्या कलामध्ये काँग्रेस 115, भाजप 82 तर जेडीएस 15 जागांवर आघाडीवर
कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांसाठीची मतमोजणी सुरू झाली आहे. पहिल्या कलामध्ये काँग्रेसला बहुमत मिळाले आहे. काँग्रेसने पहिल्या कलात 115 जागांवर आघाडी घेतली आहे.
बंगळुरू : कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांसाठीची मतमोजणी सुरू झाली आहे. पहिल्या कलामध्ये काँग्रेसला बहुमत मिळाले आहे. काँग्रेसने पहिल्या कलात 115 जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजपने अवघ्या 82 जागांवर आघाडी घेतली आहे. जेडीएसने 15 जागांवर आघाडी घेतली आहे. तर इतरांनी तीन जागांवर आघाडी घेतली आहे. पहिल्या कलात काँग्रेसने बहुमतासाठीचा आकडा पार केल्याने कर्नाटकात किंगमेकर होण्याचं जेडीएसचं स्वप्न भंगलं आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सकाळी 8 वाजता सुरू झाली. आधी पोस्टल मतांची मोजणी करण्यात आली. त्यानंतर ईव्हीएम मशीन उघडण्यात आल्या. त्यानंतर अवघ्या 45 मिनिटातच पहिल्या फेरीचे कल समोर आले आहेत. या कलामध्ये काँग्रेसला प्रचंड आघाडी मिळाली आहे. काँग्रेसने बहुमतासाठीचा आकडाही पार केला आहे. दुपारपर्यंत असंच चित्र राहिलं तर कर्नाटकात काँग्रेसचीच सत्ता येईल असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.
काँग्रेसचा रथ कोणीच रोखू शकत नाही
राज्यात बहुमतासाठी 113 जागा आवश्यक आहे. पहिल्या कलात काँग्रेसने 115 जागांवर आघाडी घेऊन बहुमताचा आकडा पार केला आहे. तर भाजप 82 आणि जेडीएस 15 जागांवर आघाडीवर आहे. इतरांनी तीन जागांवर आघाडी घेतली आहे. कल हाती येताच काँग्रेसने ट्विट करून भाजपवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. कर्नाटकात काँग्रेसचा विजय रथ कोणी रोखू शकत नाही, असं काँग्रेसने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
शेट्टर पिछाडीवर
या निवडणुकीत भाजप नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार, माजी मुख्यमंत्री सिद्धारमैया आणि जेडीएस प्रमुख एचडी कुमारस्वामी हे निवडणूक लढवत आहेत. हुबळी आणि धारवाडमधून काँग्रेसनेते जगदीश शेट्टर लढत असून या ठिकाणी ते पिछाडीवर आहेत. शेट्टर हे निवडणुकीपूर्वीच भाजपमधून काँग्रेसमध्ये आले होते. तर कर्नाटकातील मराठी बहुल परिसरातील सहा जागांपैकी 3 जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे.
प्रतिष्ठेची निवडणूक
भाजपसाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि केंद्रीय मंत्र्यांनी कर्नाटकात तळ ठोकला होता. कर्नाटकात पुन्हा सत्ता आणण्यासाठी या नेत्यांनी कंबर कसली होती. पंतप्रधान मोदी यांनी तर बजरंग बलीचा नाराही दिला होता. मात्र, असं असतानाही कर्नाटकात भाजपला अपेक्षित यश मिळताना दिसत नाहीये. दक्षिणेकडील फक्त कर्नाटक राज्यातच भाजपचं सरकार आहे. या राज्यातून सत्ता गेली तर भाजपचं दक्षिण भारतातून उच्चाटन होईल असं चित्र आहे.