पुणे शहरात कोट्यवधींचे ड्रग्स कसे आणले लपवून, ‘डीआरआय’च्या नजरेत आले अन् तस्करांच्या मुसक्या बांधल्या
drag chain suppliers in pune : राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून अमली पदार्थांचा साठा सापडत आहे. आठवड्याभरात आता तिसरा मोठा साठा मिळाला आहे.
पुणे | 26 ऑगस्ट 2023 : पुणे शहरातील वाढलेली गुन्हेगारी एक चिंतेचा विषय ठरला आहे. शहरात अधुनमधून कोयता गँगचा धुमाकूळ सुरु असतो. चोरी, दरोडे, हल्ले या घटना वाढत आहे. या गँगला रोखण्यासाठी पोलिसांनी अनेक उपाययोजना केल्या. कठोर निर्णय घेतले गेले. त्यानंतर या गँगच्या कारवाया सुरूच आहेत. राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहराला चिंतेत टाकणाऱ्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून येत आहेत. पुणे शहर ड्रग्स माफियांच्या विळख्यात आले की काय? अशी परिस्थिती गेल्या आठवड्यात निर्माण झाली आहे.
तिसऱ्यांदा मोठा साठा जप्त
पुणे शहरात आठवडेभरात तिसऱ्यांदा अमली पदार्थांचा साठा जप्त झाला आहे. यापूर्वी एक कोटीचा साठा पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने जप्त केला होता. या प्रकरणात राजस्थानमधील तीन जणांना अटक झाली होती. सुमेर जयरामजी बिष्णोई, चावंडसिंग मानसिंग राजपूत, लोकेंद्रसिंह महेंद्रसिंग राजपूत यांना अटक केली होती. यापूर्वी तीन ऑगस्ट रोजी 1 कोटी रुपयांचे अफिम जप्त केले गेले होते. त्यावेळी राजस्थानमधील राहुलकुमार भुरालालजी साहु याला अटक झाली होती. यामुळे पुण्यातील ड्रग्सचे राजस्थान मॉड्यूल समोर आले.
आता तब्बल ५० कोटींचे ड्रग्स जप्त
केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी पुणे शहरात आता तब्बल १०१ किलो अमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे. या अमली पदार्थांची किंमत तब्बल ५० कोटी ६५ लाख आहे. तेलंगणातून राज्यात एक कार येत होती. या वाहनातून अमली पदार्थांची तस्करी होत असल्याची माहिती केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेला मिळाली होती. त्यामुळे त्या वाहनांची तपासणी केली. त्यात चार निळ्या रंगाचे पिंप होते. त्या पिंपात बंदी असलेल्या मेथाक्युलोन या अमली पदार्थांचा साठा मिळाला.
पाच जणांना अटक
केंद्रीय महसूल गुप्तचर विभागाच्या पथकाने या प्रकरणी पाच जणांना अटक केली. या प्रकारामुळे ड्रग्स तस्करांचे आंतरराज्यीय रॅकेट असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. हे रॅकेट पुण्यापर्यंत पोहचले आहे.