Parabhani Crime : राजीनाम्यासाठी उपसरपंच महिलेसह कुटुंबाला मारहाण, उपसपंचाच्या मुलाचा मारहाणीत मृत्यू
पदाचा राजीनामा देण्यास दबाव टाकूनही महिला उपसरपंच राजीनामा देत नव्हती. यामुळे संतापलेल्या सरपंचाने जे केले त्याने सर्वच हादरले.
परभणी / 8 ऑगस्ट 2023 : उपसरपंच पदाचा राजीनामा देण्यासाठी दबाव टाकत सरपंचासह इतर जणांनी महिला उपसरपंचासह तिच्या कुटुंबाला मारहाण केल्याची घटना परभणीत घडली आहे. या मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने उपसरपंचाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. निखिल रमेश कांबळे असे मयत तरुणाचे नाव आहे. सेलू तालुक्यातील ब्राम्हणगावमध्ये ही घटना घडली. याप्रकरणी सरपंचासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरपंच साधना डोईफोडे, केशव डोईफोडे, पूनम डोईफोडे, महादेव डोईफोडे, कौसाबाई डोईफोडे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या घटनेमुळे ब्राम्हणगावात एकच खळबळ उडाली आहे.
काय आहे प्रकरण?
ब्राम्हणगावच्या सरपंच साधना डोईफोडे या उपसरपंच शशिकलाबाई कांबळे यांच्यावर पदाचा राजीनामा देण्यासाठी दबाव टाकत होत्या. मात्र शशिकला कांबळे पदाचा राजीनामा देत नव्हत्या. यामुळे संतापलेल्या साधना डोईफोडे यांनी अन्य चौघांसह उपसरपंच शशिकलाबाई यांच्यासह त्यांच्या कुटुंबाला मारहाण केली. या मारहाणीत शशिकलाबाई यांचा मोठा मुलगा निखिल गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मृत निखील कांबळे यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.
उपसरंपच शशिकला कांबळे यांनी सेलू पोलीस ठाण्यात रविवारी मध्यरात्री फिर्याद दाखल केली. फियादीनुसार पोलिसांनी सरपंचासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील ओव्हाळ हे प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.