Dombivali Crime : चोरटा घरात घुसला, मुद्देमाल घेतला, मालकिणीची चाहूल लागताच…; नेमंक काय घडलं?
कल्याण-डोंबिवलीत चोऱ्यांचे सत्र रोखण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे आहे. दिवसाढवळ्याही चोरटे बिनधास्त घरफोड्या करत आहेत.
डोंबिवली / 7 ऑगस्ट 2023 : कल्याण-डोंबिवलीत दिवसाढवळ्या चोऱ्यांचे सत्र वाढले आहे. डोंबिवली पूर्वेला एखाद्या नुकतीच एक घटना उघडकीस आली आहे. घरात कुणी नसल्याचा फायदा घेत चोरट्याने कुलूप तोडून घरात प्रवेश केला. मग घरातील पैसे, दागिने चोरले. पण घराबाहेर पडण्याआधीच घरमालकिण दारात हजर झाली आणि चोराचा एकच गोंधळ उडाला. चोर दागिने आणि पैसे घेऊन पसार झाला. मात्र या गोंधळात चोरटा त्याचा मोबाईल तिथेच विसरला आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला. मोबाईलच्या कॉल रेकॉर्डवरुन मानपाडा पोलिसांनी आरोपीच्या साथीदाराला अटक केली आहे. तर मुख्य आरोपी फरार असून, पोलीस त्याचाही शोध घेत आहेत. दोघा चोरट्यांवर मुंबई, नवी मुंबईतही गुन्हे दाखल आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंबिवली पूर्वेकडील एमआयडीसी परिसरातील सिमेन्स सोसायटीत चोरट्याने एका घरात डल्ला मारला. विशेष म्हणजे ज्या घरात चोरट्याने डल्ला मारला, त्याच घरमालकिणीला त्याने पत्ता विचारला होता. सदर महिला आपल्या मुलाला ट्युशनला सोडायला चालली होती. यावेळी एक अनोळखी इसम इमारतीत आला आणि महिलेला पत्ता विचारु लागला. महिलेने त्याला पत्ता सांगितला आणि निघून गेली.
यानंतर चोरट्याने त्याच महिलेच्या दरवाजाचे कुलूप तोडले आणि आत घुसून दागिने, पैसे चोरले. इतक्यात महिला घरी परतली आणि पाहते तर पत्ता विचारणारी व्यक्ती तिच्या घरात घुसली होती. महिलेने त्याचा जाब विचारताच तो पळून गेला. पण या गडबडीत तो स्वतःचा मोबाईल महिलेच्या घरीच विसरला. यानंतर महिलेने मानपाडा पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल केली. तसेच पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत चोरट्याचा मोबाईलही जप्त केला.
आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल कॉल रेकॉर्डवरुन पोलिसांनी इमारतीखाली पाळत ठेवणाऱ्या चोरट्याच्या साथीदाराची ओळख पटवत त्याला अटक केली. सदर गुन्ह्याचा तपास कल्याण परिमंडळ 3 चे पोलीस आयुक्त, कामगीर परिमंडळ 3, कल्याण पोलीस उप आयुक्त सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त डोंबिवली विभाग सुनिल कुराडे, प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश मदने यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील तारमळे, अविनाश वणवे, पोलीस हवालदार राजेंद्र खिल्लारे, यलप्पा पाटील, पवार, कसबे, गडगे यांनी केला.