Kalyan Crime : कल्याण-डोंबिवलीत दुचाकी चोरांनंतर आता सायकल चोरांचा सुळसुळाट, घटना सीसीटीव्हीत कैद
कल्याण-डोंबिवलीत चोरीचे सत्र थांबण्याचे नावच घेताना दिसत नाही. दुचाकी चोरांनंतर आता सायकल चोरांचा सुळसुळाट झाला आहे.
कल्याण / 7 ऑगस्ट 2023 : कल्याण-डोंबविलीत चोरीच्या घटना कमी होण्याचं नावच घेताना दिसत नाहीत. दुचाकी चोरांनंतर आता सायकल चोरांचा सुळसुळाट कल्याण-डोंबिवलीत झाला आहे. तोंडाला रुमाल बांधून चोरटे सोसायट्यांमध्ये घुसतात आणि सायकल चोरुन पसार होतात. अशीच एक घटना कल्याण पश्चिमेतील बाबासाहेब आंबेडकर रोडवर उघडकीस आली आहे. एका सोसायटीत तोंडाला रुमाल बांधून आरोपी घुसला आणि सायकल चोरुन पसार झाला. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्याचा शोध घेत आहेत.
सुरक्षारक्षक नसल्याचा फायदा घेत चोरी
कल्याण पश्चिमेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवरील सनराईज हौसिंग सोसायटीत सुरक्षारक्षक नसल्याचा फायदा घेत चोरटा तोंडाला रुमाल बांधून सोसायटीत घुसला. त्यानंतर सोसायटीत उभी असलेली सायकल घेऊन निघून गेला. सोसायटीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे. सकाळी सायकल चोरीला गेल्याचे लक्षात येताच अशोक सोलंकी या व्यक्तीने कल्याण बाजारपेठ पोलीस ठाणे गाठत चोरीची तक्रार दाखल केली. सोलंकी केडीएमसीचे कर्मचारी आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे. सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्याचा शोध सुरु आहे.
शहरातील जीवनशैली बदलली असल्यामुळे सध्या प्रत्येकजण फिटनेस फंड्याचा अवलंब करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. त्यामुळे लोकं सध्या सायकल चालवणं जास्त पसंत करतात. त्यासाठी बाजारातून महागड्या सायकली मोठ्या प्रमाणावर खरेदी केल्या जातात. म्हणूनच सध्या या चोरांनी महागड्या सायकलींची चोरी करण्यावर लक्ष केंद्रीत केलं असल्याचं म्हटलं जात आहे. तसेच डोंबिवलीमधील रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दती काही महिन्यांपासून सायकल चोरीला जाण्याच्या घटना वाढल्या आहेत. मात्र पोलिसांनी ठोस अशी करावाई केलेली नाही.