Mumbai Crime : लग्नाचे आमिष दाखवत प्रेयसीलाच गंडा, सोशल मीडियावरील प्रेम तरुणीला महागात पडले !
सोशल मीडियावर प्रेमसंबंधातून फसवणुकीच्या अनेक घटना समोर येत आहेत. अशीच एक घटना गोरेगावमध्ये घडली आहे. वारंवार घडणाऱ्या घटना पाहता तरुणींनी सावध राहण्याची आवश्यकता आहे.
मुंबई / 21 ऑगस्ट 2023 : हल्ली सोशल मीडियावर ओळख करत प्रेम करण्याची जणू प्रथाच पडत आहे. पण याच सोशल मीडियामुळे गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत आहे. अशीच एक घटना मुंबईतील गोरेगावमध्ये उघडकीस आली आहे. लग्नाचे आमिष दाखवत एका तरुणीची 38 लाखांची फसणूक केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी बांगूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. सौरभ रमाकांत पवार असे अटक आरोपीचे नाव आहे. आरोपीने अशा प्रकारे किती लोकांची फसवणूक केली आहे, याबाबत पोलीस चौकशी करत आहेत.
सोशल मीडियाच्या माध्यमातून झाली दोघांची ओळख
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 वर्षीय पीडित तरुणी गोरेगाव येथे कुटुंबासह राहते. अंधेरीतील एका खाजगी कंपनीत ती नोकरी करते. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये तरुणीची 27 वर्षीय आरोपीशी ओळख झाली होती. त्यानंतर आरोपी सौरभने तिला लग्नाचा प्रस्ताव दिला. तरुणीने प्रस्ताव मान्य करताच दोघांच्या भेटीगाठी होऊ लागल्या. भेटीदरम्यान सौरभ अनेकदा तिचा मोबाईल घ्यायचा.
अशी केली फसवणूक?
दरम्यान, तरुणीला एका बँकेचा 4 लाख रुपये कर्ज घेतल्याचा मेल आला. मेल पाहून तरुणीला धक्काच बसला. तिने सौरभला याबाबत विचारणा केली असता त्याने कर्ज घेतल्याचे कबूल केले. आपल्याला पैशांची गरज असल्याने आपण हे कर्ज घेतल्याचे त्याने कबूल केले आणि कर्जाची रक्कम आपल्या बँक खात्यात ट्रान्सफर करुन घेतली. यानंतर या कर्जाची परतफेड करण्यासाठी त्याने दुसऱ्या बँकेतून कर्ज घेतले.
यानंतर मे महिन्यात त्याने लग्नासाठी नवीन कार घेण्यासाठी तरुणीला कार लोन घेण्यास सांगितले. तरुणीही तो सांगेल त्याप्रमाणे करत गेली. तिने 9.5 लाखांचे कार लोन घेऊन कार खरेदी केली. अशाप्रकारे त्याने वैयक्तिक, कार लोन आणि इतर कामांसाठी असे तिच्यावर नावावर एकूण 38 लाखांचे कर्ज घेतले. यानंतर आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच तरुणीने बांगूर नगर पोलीस ठाण्यात धाव घेत सौरभविरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी त्याला अटक केली आहे.