Dahisar News : खदान तलावात पोहायला गेले, 7 मित्रांपैकी दोघे बुडाले! 5 मित्र शॉकमध्ये, एक मृतदेह हाती
Dahisar Drowned News : एका तरुणाचा मृतदेह शोधण्यात फायर ब्रिगेडच्या जवानांना यश आलंय. तर दुसऱ्या मृतदेहाचा शोध घेतला जातोय.
मुंबई : मंगळवारी मुंबईत (Mumbai Rains News) सर्वदूर पावसाने जोरदार हजेरी लावली. भर पावसामध्ये तलावात पोहण्याचा आनंद घेण्यासाठी सात तरुण खदान तलावात गेले होते. पण त्यातील दोघा जणांना पाण्याचा अंदाज आला नाही आणि ते बुडाले (Dahisar Drowned News). तर पाच तरुण थोडक्यात बचावले. दहिसरमध्ये ही दुर्दैवी घटना घडली. दरम्यान, बुडालेल्या दोघा तरुणांपैकी एका तरुणाचा मृतदेह हाती लागला आहे. तर दुसऱ्याचा शोध अजूनही सुरु असल्याची माहिती मिळतेय. फायर ब्रिगेडच्या मदतीने शोधकार्य केलं जातंय. या घटनेमुळे दहिसर, बोरीवली (Borivali Rain) परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय. तर दोघा मित्रांचा बुडून मृत्यू झाल्यानं सोबत आलेल्या पाच मित्रांना मोठा धक्का बसलाय.
नाकातोंडात पाणी जाऊन गुदमरले
मंगळवारी बोरीवली पश्चिम येथील सात तरुण तलावात पोहण्यासाठी गेले. दहिसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खदान तलाव इथं ते पोहण्यासाठी आले. पण पोहण्यासाठी आलेल्या सात पैकी दोघे तरुण बुडू लागले. नाकातोंडात पाणी जाऊन दोघे तरुण पाण्यात बुडाले. तर पाच जण बालंबाल बचावले. या तरुणांचं वय अंदाजे 25 वर्ष होतं. वैशाली नगर इथं असलेल्या खदाणीच्या तलावात ही घटना घडली.
एकाचा मृतदेह हाती
दरम्यान, या घटनेबाबतची माहिती मिळाल्यानंतर फायर ब्रिगेडचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने बचावकार्य करण्यास सुरुवात केली. त्यानंतर एका तरुणाचा मृतदेह शोधण्यात फायर ब्रिगेडच्या जवानांना यश आलंय. तर दुसऱ्या मृतदेहाचा शोध घेतला जातोय.
#WATCH | Maharashtra | Two people drowned after they went to take a bath in a pond in Mumbai’s Dahisar area. One of the bodies has been found and a search operation underway for the other: Mumbai Fire Brigade (MFB) pic.twitter.com/WIOs1tRZNk
— ANI (@ANI) July 5, 2022
बुडून मृत्यू झालेल्या दोघा तरुणंची नावं शेखर विश्वकर्मा आणि अजय जोगदंड अशी आहेत. शेखरचा मृतदेह हाती लागला असून अजयचा शोध सुरु आहेत. दोघांचही वय 25 वर्ष होतं. अजय जोगदंड हा रिक्षा चालवण्याचं काम करायचा. तर शेखर विश्वकर्मा हा बांधकाम संबंधी काम करायचा.
मुंबईला ऑरेंज अलर्ट
दुसरीडकडे मुंबईत पावसाला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. आज उद्या अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर शुक्रवारपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. अत्यंत महत्त्वाचं काम नसेल, तर शक्यतो घरातून बाहेर पडू नये, असं आवाहनही करण्यात आलंय. त्याचप्रमाणे लोकांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आलाय.