Twitter : ट्विटर खरेदीसाठी Elon Musk इरेला का पेटले? या उद्योगात नेमकं मिळवायचं तरी काय?
Twitter : ट्विटर खरेदीसाठी एलॉन मस्क यांनी एवढा आटापिटा कशासाठी केला असेल बरं..
नवी दिल्ली : एलॉन मस्क (Elon Musk) आता ट्विटरचे (Twitter) अधिकृत मालक झाले आहेत. पण ट्विटर खरेदी करण्यासाठी मस्क यांनी एवढा आटापिटा केला कशासाठी असा प्रश्न अनेकांना पडला आहे. सध्या त्यांची कंपनी अनेक क्षेत्रात उत्तम कामगिरी करत असातना सोशल मीडिया (Social Media) खरेदीचा उद्योग त्यांनी कशासाठी केला, या प्रश्नाचं उत्तर काय बरं आहे..
मस्क यांनी ट्विटरवर एक पोस्ट टाकली आहे. त्यामध्ये त्यांनी या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. सोशल मीडिया कंपनी कशासाठी खरेदी केली? याविषयीचा तर्क मस्क यांनी मांडला आहे. ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.
पण खरी तर ही पोस्ट जाहिरात देणाऱ्यांसाठी आहे. त्यांनी या खरेदी मागची व्यावसायिक बाजू मांडलेली नाही. सभ्यता आणि मानवतेसाठी त्यांनी ट्विटरचा सौदा केल्याचा दावा मस्क यांनी केला आहे.
मी ट्विटर का खरेदी केले आणि जाहिरातींविषयी माझे मत काय आहे या विषयी सध्या ऊहापोह सुरु आहे. पण यातील अर्ध्याधिक मते चुकीची असल्याचा दावा त्यांनी केला. ट्विटर खरेदीची त्यांची बाजू त्यांनी भावनिकपणे मांडली आहे.
भविष्यात, मानवी सभ्यातांना एक सर्वमान्य डिजिटल टाऊन स्केअर मिळणे आवश्यक आहे. हा प्लॅटफॉर्म हिंसामुक्त असावा आणि विश्वासाच्या आधारे अनेक मुद्यांवर निकोप चर्चा झडायला हवी असा दावा त्यांनी केला आहे.
ट्विटर खरेदीमागे त्यांचे कमाईचे उद्दिष्ट नाही. तर मानवतेची मदत करण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत. मी मानवतेच्या प्रेमात आहे. मानवतेला मदत करण्यासाठी मी काहीही करु शकतो, असे मत त्यांनी मांडले.
ट्विटरवरील जाहिरातीसंदर्भातही त्यांनी त्यांची स्पष्ट मते मांडली. ज्या जाहिराती योग्य नाही वा गरजेच्या नाहीत, त्यांना लगाम घालण्याचे त्यांनी स्पष्ट केले.
4 एप्रिल रोजी 44 बिलियन डॉलरच्या या कराराची मस्क यांनी घोषणा केली होती. यापूर्वी या कंपनीत त्यांची 9.2 टक्के हिस्सेदारी होती. तर इतर वाटा त्यांनी खरेदी केला आहे. त्यामुळे ते आता या कंपनीत सर्वात मोठे शेअरधारक झाले आहेत.