IRCTC Pet Tickets : लाडक्या ‘पेट’सोबत करा रेल्वेचा प्रवास! पाळीव प्राण्यांसाठी असे करता येणार तिकीटाचे बुकिंग
IRCTC Pet Tickets : आता रेल्वेच्या प्रवासात तुमचा कुटुंबातील सदस्य, पाळीव प्राण्याला पण नेता येईल. त्यासाठी तिकिट बुकिंगची लवकरच व्यवस्था करण्यात येणार आहे, ही प्रक्रिया अशी करता येईल.
नवी दिल्ली : आता तुमचे लाडके पाळीव प्राणी (Pet) तुम्हाला रेल्वेतून घेऊन जाता येणार आहे. अनेकांना पाळीव प्राण्यांचा विशेष लळा असतो. पण पाळीव प्राण्यांना इतर ठिकाणी इच्छा असून ही नेता येत नाही. सार्वजनिक परिवहन व्यवस्थेत पाळीव प्राणी नेता येत नाहीत. पण भारतीय रेल्वे (Indian Railway) पाळीव प्राणी घेऊन जाण्यासाठी परवानगी देण्याच्या तयारीत आहे. त्यासाठीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. सध्या रेल्वेतून पाळीव प्राणी नेता येतात. पण ते पॅसेंजर बोगीतून घेऊन जाता येत नाही. सामानाच्या डब्यातून त्यांना घेऊन जाता येते.
सध्याची व्यवस्था सध्यस्थितीत पाळीव प्राणी नेण्यासाठी प्रवाशांना पार्सल बुकिंग काऊंटरवरुन तिकिट बुक करता येते. प्रवाशांना त्यांच्या पाळीव प्राण्यासाठी द्वितीय श्रेणीचे सामानाचे तिकीट खरेदी करावे लागते. ब्रेक व्हॅनमध्ये एका बॉक्समध्ये त्यांचा लाडका पाळीव प्राणी नेण्याची सध्या परवानगी आहे. हत्ती, पशुपक्षी नेण्यासंबंधीचे रेल्वेचे काही नियम आहेत. त्यासाठी वेगवेगळी कोचची व्यवस्था करण्यात आली आहे. घरगुती पाळीव प्राणी मांजर, कुत्रा त्यांच्या मालकासोबत संबंधित कोचमधून प्रवास करु शकतात.
इतका येतो खर्च सध्या प्रवाशांना एसी फर्स्ट क्लासचे दोन वा चार बर्थचा फुल कूप बुक करावा लागतो. त्याचा खर्च खूप मोठा आहे. कुत्र्याला डॉग बॉक्समध्ये नेल्यास त्याला ट्रेनमध्ये सध्या लागू असलेल्या सामानाच्या दरानुसार शुल्क अदा करावे लागते. सध्या एका कुत्र्यासाठी 30 किलोग्रामचे शुल्क आकारण्यात येते. तर एसी फर्स्ट क्लासच्या डब्यात कुत्र्यांना नेण्यासाठी 60 किलोचे शुक्ल अदा करावे लागत होते. पण एसी 2 टीयर, एसी 3 टीयर, एसी चेअर कार, स्लीपर क्लास आणि सेकेंड क्लासमध्ये पाळीव प्राणी नेण्यास बंदी होती.
आता ऑनलाईन बुकिंग रेल्वे मंत्रालयाने, प्रवासात पाळीव प्राणी नेण्यासंबंधीत एक प्रस्ताव तयार केला आहे. त्यानुसार, प्रवाशांना त्यांच्या तिकिटासोबतच आता पाळीव प्राण्यांसाठी ऑनलाईन तिकीट बुक करता येणार आहे. रेल्वे मंत्रालय टीटीईला यासंबंधीचे अधिकार देण्याचा विचार करत आहे. रेल्वेतील एसी-1 श्रेणीतील प्रवाशांना त्यांच्या सोबत कुत्रे, मांजर नेता येईल. त्यासाठी आता त्यांना पार्सल बुकिंग काऊंटरवर जाण्याची गरज राहणार नाही. ऑनलाईन बुकिंग करता येईल.
IRCTCचे निर्देश
- एसी-1 श्रेणीतील प्रवाशांना ऑनलाईन बुकिंगची सुविधा देण्यात येत असली तरी पाळीव प्राणी नेण्यासाठी सामान शुल्क लागू असेल. त्यांना त्याच नियमानुसार, ऑनलाईन बुकिंग करता येईल.
- एसी 2 टीयर, एसी 3 टीयर, एसी चेअर कार, स्लीपर क्लास आणि सेकेंड क्लासमध्ये पाळीव प्राणी नेण्यास बंदी कायम आहे. या डब्यातील प्रवाशी आक्षेप घेत असल्याने ही सुविधा देण्यात आलेली नाही. एसी-1 श्रेणीतील प्रवाशांनी आक्षेप घेतल्यास तुमच्या पाळीव प्राण्याला विशेष कोचमध्ये नेण्यात येईल. त्यासाठी कोणताही परतावा देण्यात येणार नाही.
- पाळीव प्राण्याला प्रवासात सोबत घेताना, पशुवैद्यकीय डॉक्टरकडून प्रमाणपत्र घ्यावे लागेल. तसेच इतर प्रवाशांना त्याचा त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल. त्याच्या खाण्यापिण्याची व्यवस्था मालकाला घ्यावी लागेल.