Free Rail Journey : ना तिकीट, ना तिकीट तपासणीस, 75 वर्षांपासून या रेल्वेतून प्रवाशांचा मोफत प्रवास
Free Rail Journey : या रेल्वे मार्गावर प्रवास अगदी मोफत आणि आरामात करण्यात येतो.
नवी दिल्ली : रेल्वेतून (Indian Railways) मोफत प्रवास (Free Journey) करणाऱ्या फुकट्या प्रवाशांची भारतात कमी नाही. रेल्वेतून प्रवास हा रस्ते प्रवास, हवाई प्रवासापेक्षा अत्यंत स्वस्त आहे. देशात लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी रेल्वेचा प्रवास सूखकर आणि आरामदायक मानण्यात येतो. त्यामुळे अनेक प्रवाशी तिकीट न काढताच प्रवास करतात. त्यांना तिकीट तपासणीस (TTE) पकडतात आणि दंडासह तिकीटाची रक्कम वसूल करतात. पण या रेल्वेमार्गावर तुम्हाला कुठलेही तिकीट द्यावे लागणार नाही. या रेल्वे मार्गावर तुम्हाला तिकीट तपासणीसही भेटणार नाही. भारतात या ठिकाणी देशातीलच नाही तर जगभरातील प्रवाशासाठी कोणतेच तिकीट नाही.
भारतातील हा मोफत ट्रेनचा प्रवास आता सुरु झालेला नाही. तर गेल्या 75 वर्षांपासून सर्वच नागरिकांना मोफत प्रवास घडवत आहे. ही ट्रेन पंजाब आणि हिमाचल प्रदेशच्या सीमावर्ती भागातून धावते. भांगरा-नागल या प्रसिद्ध धरणाचे नाव तुम्ही ऐकले असेल. ही ट्रेन भांगरा-नांगल नावाने ओळखली जाते.
जगभरातील पर्यटक भांगडा-नांगल धरण पाहण्यासाठी येतात. तेव्हा या धरणापर्यंत येण्यासाठी या ट्रेनचा वापर करण्यात येतो. या रेल्वे प्रवासात पर्यटकांकडून, नागरिकांकडून एक रुपयाही घेण्यात येत नाही. या प्रवासासाठी कुठल्याच प्रकारचे तिकीट घेण्यात येत नाही.
स्वातंत्र्यपूर्व काळात 1948 साली ही ट्रेन सुरु करण्यात आली होती. तेव्हापासून या रेल्वेचा प्रवास मोफत आहे. या रेल्वेचा डब्बा लाकडी आहे. या रेल्वेला पूर्वी 10 कोच होते. आता या रेल्वेत केवळ 3 कोच आहेत. तरीही या रेल्वेने दररोज जवळपास 800 लोक प्रवास करतात.
ही रेल्वे भारताचा वारसा आहे. त्यामुळे या रेल्वेचे आणि रेल्वे मार्गाचे जतन करण्यात येत आहे. आर्थिक तोट्याचे कारण पुढे करत 2011 साली ही रेल्वे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण नंतर हा निर्णय मागे घेण्यात आला. आजही या रेल्वे प्रवासासाठी नागरिकांकडून कुठलेही शुल्क आकारण्यात येत नाही.