Twitter : एका टॅपमध्ये शेअर होणार ट्विट, ट्विटरवर येतंय WhatsApp शेअर आयकॉनचं नवं फिचर
400 दशलक्षाहून अधिक व्हॉट्सअॅप यूझर्स आहेत. या पार्श्वभूमीवर ट्विटरने आपल्या तसेच व्हॉट्सअॅपच्या यूझर्ससाठी हे पाऊल उचलले आहे.
मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरवर (Twitter) लवकरच एक नवीन फीचर येणार आहे. जर तुम्हीदेखील ट्विटर वापरत असाल, तर आमची आजची ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कंपनी एका नवीन फीचर आणण्याच्या तयारीत आहे आणि हे फीचर आहे व्हॉट्सअॅप (WhatsApp) बटण. हे फीचर आल्यानंतर यूजर्सना ट्विट थेट व्हॉट्सअॅपवर शेअर करण्याची सुविधा मिळणार आहे. ट्विटर इंडियाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ट्विट करून ही माहिती देण्यात आली आहे. ट्विटरने ट्विट केले आहे, की तुमच्यापैकी काहींना ट्विटच्या खाली WhatsApp शेअर आयकॉन दिसत असेल आणि तुम्ही या आयकॉनवर क्लिक कराल तेव्हा तुम्हाला कसे वाटते ते आम्हाला नक्की सांगा. ट्विटरवर व्हॉट्सअॅप शेअर आयकॉन फीचर (Feature) आल्याने यूजर्सना विविध सुविधा मिळणार आहेत.
ट्विटच्या तळाशी दिला पर्याय
ट्विटच्या तळाशी चार पर्याय दिसत आहेत, एक रिप्लाय, दुसरा रिट्विट, तिसरा लाइक आणि चौथा रेग्युलर शेअर आयकॉन देण्यात आला आहे. हे नियमित शेअर आयकॉन सध्या यूझर्सना ट्विटची लिंक कॉपी करणे, ट्विटद्वारे शेअर करणे, डायरेक्ट मेसेजद्वारे पाठवणे आणि बुकमार्कसारखे पर्याय दाखवते.
some of you might see a WhatsApp Share icon and if you do, let us know what you think pic.twitter.com/Y23vWUPTs1
— Twitter India (@TwitterIndia) September 8, 2022
400 दशलक्षाहून अधिक व्हॉट्सअॅप यूझर्स
ट्विटर इंडियाने व्हॉट्सअॅप शेअर आयकॉनसाठी केलेल्या ट्विटमध्ये हा चौथा नियमित शेअर आयकॉन व्हॉट्सअॅप शेअर आयकॉनने बदलला आहे. भारतात WhatsApp किती लोकप्रिय आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे, 400 दशलक्षाहून अधिक व्हॉट्सअॅप यूझर्स आहेत. या पार्श्वभूमीवर ट्विटरने आपल्या तसेच व्हॉट्सअॅपच्या यूझर्ससाठी हे पाऊल उचलले आहे.
एडिटचा ऑप्शन अद्याप प्रतीक्षेत
सध्या एका फिचरबद्दल चर्चा सुरू आहे. ट्विट एडिट करण्याचा पर्याय अद्याप उपलब्ध नाही. ट्विट केल्यानंतर ते सदोष असल्यास यूझर्सना ते ट्विट डिलीट करावे लागते. हे अत्यंत बेसिक फिचर असूनही ते ट्विटरकडून अद्यापही देण्यात आलेले नाही. यावर लवकरच पर्याय मिळणार असल्याचे ट्विटरने म्हटले असले तरी किती कालावधी लागणार, हे मात्र स्पष्ट झालेले नाही.