WhatsApp Feature : व्हॉट्सॲपने लाँच केलं स्क्रिन शेअरिंग फीचर, कसं काम करतं ते जाणून घ्या
व्हॉट्सॲपने आपल्या युजर्ससाठी आणखी एक फीचर आणलं आहे. यामुळे युजर्स व्हिडीओ कॉल दरम्यान आपली स्क्रीन शेअरिंग करू शकणार आहे. यापूर्वी असं फीचर गुगल मीट आणि झूमच्या ऑनलाइन मीटिंग दरम्यान पाहिलं गेलं आहे.
मुंबई : व्हॉट्सॲप हे सर्वाधिक वापरलं जाणारं मेसेजिंग ॲप आहे. स्मार्टफोन असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या मोबाईलमध्ये हे ॲप पाहायला मिळतं. त्यामुळे युजर्संना आवश्यक असलेल्या गोष्टी पुरवण्याचं काम व्हॉट्सॲपच्या माध्यमातून होत असतं. युजर्सच्या गरजा ओळखून त्यात नव्या फीचर्सची भर घातली जाते. असंच एका फीचर्सची भर व्हॉट्सॲपने युजर्ससाठी आणली आहे. या फीचरचं नाव स्क्रिन शेअरिंग असं आहे. मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी या फीचर्सची माहिती दिली आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवरून सांगितलं की, “व्हॉट्सॲपच्या व्हिडीओ कॉलमध्ये स्क्रिन शेअरिंग फीचर जोडत आहोत.” या फीचर्सच्या माध्यमातून व्हिडीओ कॉलिंग करताना मोबाईल स्क्रिन शेअर करता येणार आहे. या माध्यमातून एक युजर्स आपल्या मोबाईलमधील कंटेंट दुसऱ्या युजर्सला दाखवू शकतो. तसेच काही अडचण असेल तर त्या माध्यमातून सांगू शकतो.
स्क्रिन शेअरिंग ॲप कसं काम करणार?
व्हॉट्सॲपचं स्क्रिन शेअरिंग फीचर यापूर्वी बीटा वर्जन युजर्ससाठी होतं. पण आता सर्वच युजर्ससाठी आणलं गेलं आहे. त्यामुळे लवकरच तुम्हाला या फीचरचा उपभोग घेता येणार आहे. व्हॉट्सॲप स्क्रिन शेअरिंग फीचर वापरताना युजर्सला व्हिडीओ कॉल दरम्यामन ‘Share’ नावाच्या आयकॉनवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर युजर्स स्पेसेफिक ॲप्लिकेशन किंवा संपूर्ण स्क्रिनचा वापर करू शकेल.
स्क्रिन शेअरिंगच्या मदतीने व्हॉट्सॲप युजर्संना सुविधा मिळणार आहेत. मीटिंग दरम्यान दुसऱ्या युजर्सला डॉक्युमेंट आणि दुसरा कंटेंट शो करता येणं शक्य आहे. या माध्यमातून युजर्स डॉक्टर किंवा नातेवाईकांसोबत स्क्रिन शेअर करून व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून प्रश्न विचारू शकतात. त्याचबरोबर ज्यांना फोनबाबत जास्त काही कळत नाही अशा व्यक्तींना या माध्यमातून मदत करता येणार आहे.
व्हॉट्सॲपच्या स्क्रिन शेअरिंग फीचरमुळे दुसऱ्या मेसेजिंग ॲप्सच्या अडचणीत वाढ होणार आहे. शक्यतो मीटिंगसाठी लोकं गुगल मीट आणि झुम सारख्या प्लॅटफॉर्मचा वापर करतात. या माध्यमातून स्क्रिन शेअरिंग करता येते. पण आता ही सुविधा व्हॉट्सॲपवर मिळणार आहे. त्यामुळे गुगल मीट आणि झुमच्या युजर्सवर परिणाम दिसू शकतो.